“कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट ? एक गूढ… शोध आणि तर्क

Tom Hanks

“कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट ? एक गूढ… शोध आणि तर्क

“कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट ? एक गूढ… शोध आणि तर्क :
टॉम हॅन्क्सची मध्यवर्ती भूमिका आणि ऑस्कर सन्मान प्राप्त दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस यांच्या सन २००० मध्ये आलेल्या अनोख्या अशा “कास्ट अवे” या चित्रपटाने जगभर कौतुकास्पद अशी किर्ती मिळविली आणि आर्थिक मिळकतीबाबतही त्या साली जागतिक विक्रम केला. कथा सांगायची गरज नाहीच इतका हा चित्रपट सर्वत्र लोकप्रिय झाला होता. मला खात्री आहे फ़ेसबुकवर जे कुणी इंग्रजी चित्रपटप्रेमी आणि रसिक मंडळी आहेत त्या सर्वांनी या चित्रपट पाहिला असणार, शिवाय टीव्ही चॅनेल्सवरूनही वारंवार हा चित्रपट दाखविला गेला आहेच. आज १७ वर्षे झाली या चित्रपटाला त्यामुळे कदाचित वाचकांना असेही वाटू शकेल की या लेखाचा उद्देश्य काय असेल ? तो आहे या चित्रपटाचा शेवट. चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाल्यावर झेमेकिस मांडणी पद्धत तसेच टॉम हॅन्क्स याने चित्रपटाचा नायक “चक नोलॅन्ड” या सिस्टिम इंजिनअरच्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्यासाठी शरीराची विशिष्ट व्यायामाद्वारे निर्माण केलेली ठेवण यावर खूप लिहिले गेले आहे. म्हणजे सुरुवातीला दाखविलेला चक नोलॅन्ड हा सुखवस्तू आहे, सुंदर प्रेयसी आहे जी त्याच्याशी लग्न करण्याची मनिषा बाळगून प्रेम करते. भरभराटीने चाललेली नोकरी, घरदार, गाडी, संपत्ती, सामाजिक दर्जा सारे काही आहे. मात्र एक दिवस असा उजाडतो की चक प्रवास करीत असलेल्या फ़ेडएक्सच्या विमानाला तुफ़ान पावसामुळे अपघात होतो, समुद्रात कोसळते, स्टाफ़ क्रू नाहीसा होतो, मरून जातात आणि एकटा चक जीवनरक्षक बेल्टबोटच्या साहाय्याने एका निर्जन बेटावर येऊन आदळतो. शुद्धीवर येतो व नंतर किना-याची पाहाणी केल्यावर त्याला उमजून येते की या प्रचंड बेटावर तो एकमेव मनुष्यप्राणी आहे आणि आता एकट्यानेच इथे जितके दिवस काढता येतील तितके काढायचे आहे (चक्क चार वर्षे एकटा राहतो). खायाला अन्न नाही. किनार्याशेजारील झाडीत पडत असलेले नारळ उचलून त्यातील खोबरे खात दिवस काढत राहतो, नंतर हळूहळू मासेमारीदेखील शिकतो. यात त्याची तब्येत कमालीची उतरणे नैसर्गिकच म्हणावे लागेल. तर टॉम हॅन्क्सच्या या दुस-या टप्प्यातील भूमिकेचे चित्रिकरण सुरू होण्यापूर्वी चक्क एक वर्ष त्याला अद्न्यात स्थळी जाऊन जवळपास ५० पौंड वजन उतरण्याचा कार्यक्रम राबवावा लागला होता. त्या दरम्यान निर्माता दिग्दर्शक झेमेकिसने “कास्ट अवे” चे काम पूर्ण बंद केले आणि दुस-या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. तब्येत खराब झालेली आणि दाढीमिशांचे जंगल (जै नैसर्गिक होते) समाधानकारक अवतरले आहे असे दिसल्यावर प्रत्यक्ष बेटावरील घटनांचे शूटिंग सुरू झाले.

लोकप्रियतेच्या शिखरानंतर दोनचार वर्षे गेल्यावर चित्रपटाच्या यशासोबत मग समीक्षक आणि चित्रपट रसिकामध्ये कास्ट अवेच्या शेवटाबाबत वैचारीक देवाणघेवाणी सुरू झाल्या होत्या…[हॉलीवूडमध्ये हा प्रकार नेहमी चर्चेला असतो. अनेक उदाहरणासह माहिती देता येईल]. ज्यानी हा चित्रपट पाहिला आहे त्याना या क्षणी सुरुवात आठवणार नाही मात्र चित्रपटाचा शेवट आठवेल. समाजजीवनात पुन्हा परतलेला इंजिनिअर चक नो्लॅन्ड आता एकटा राहतोय. त्याच्या समवेत विवाहजीवन साजरे करू इच्छिणारी युवती “केली फ़्रीअर्स” चकच्या विमान अपघा्ताची आणि त्यातील सर्व स्टाफ़च्या मृत्यूची बातमी वाचून साहजिक खचून जाते आणि एक वर्षा्नंतर दुसर्या मि्त्रासोबत लग्न करून वैवाहिक जीवन चालू करते. तिला एक मुलगीही झाली असून ठीक संसार करत असल्याचे दाखविले गेले आहे. चक हयात असून तो सुखरूप परत आला आहे ही बातमी तिला आनंद देणारी असली तरी आता ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही. समजूतदार स्वभावाचा चक ती बाब मान्य करतो आणि तिचा अखेरचा निरोप घेऊन तो आपल्या फ़ेडएक्सच्या व्यवसायात लक्ष घालतो. अनेक कामापैकी एक काम आहे त्याच्याकडे ते म्हणजे बेटीना पीटर्सन या स्त्री चे पार्सल तिला तिच्या पत्त्यावर पोच करायचे आहे. ते पार्सल त्याने त्या निर्जन बेटावर स्वत:जवळ चार वर्षे ठेवले आहे. अन्य पार्सल्सदेखील असतात पण त्यातील वस्तू त्याने आपल्या तेथील उपयोगासाठी वापरासाठी म्हणून काढून घेतल्या आहेत. बेटीनाच्या पार्सल वर दोन एन्जल्सचे पंख पसरलेले चित्र आहे….हा तिच्या कंपनीचा ब्रॅन्ड फ़ोटो. याच कंपनीने तयार केलेल्या टॉयलेट डोअर्सचा….जे त्याला विमानातून वाहात आलेल्या अनेक वस्तूंतून मिळालेले असते व त्याचा तो पुढे होडीच्या शिडासारखा उपयोग करून घेतो. पार्सलवरून तो हळुवारपणे बोटे फ़िरवितो आणि मनी म्हणतो, राहू दे असेच. त्यात काय आहे हे त्याला अर्थात माहीत नाही. चित्रपटाच्या शेवटी नव्याने आयुष्य सुरू केलेला चक नोलॅन्ड टेक्सास प्रांतातील बेटीनाच्या वस्तीकडे प्रवास सुरू करतो. हद्दीबाहेर चौरस्ता लागलेला आहे. त्यातील नकाशावरून एका रस्त्याची निवड करून तो बेटीनाच्या घरी तसेच वर्कशॉप एरियात पोचतो. पण तिथे कुणीच नसते. हाका मारतो. प्रतिसाद कुणाकडून येत नाही. तेव्हा नाईलाजास्तव चक ते पार्सल दाराजवळ ठेवतो व तिथे एक चिठ्ठी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ठेवतो…”This package saved my life. Thanks. Chuk Noland.” ~ पार्सल ठेवून चक पुन्हा त्या चौपदरी रस्त्यावर येतो….नकाशा काढून पाहातो आता आपल्याला कोणत्या रस्त्याने गेले पाहिजे…नकाशा पाहात असताना त्याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने एक डिलिव्हरी व्हॅन येते. त्याच्याजवळ थांबते आणि त्यातून ड्रायव्हिंग करणारी देखणी युवती चेष्टेच्या स्वरात त्याला विचारते, “रस्त्यात भरकटून गेलेला दिसतोस….!” तिला पाहून तोही स्मितहास्य करून कबुली देतो गोंधळाची. स्थानिक असल्यामुळे ती त्याला चारही रस्ते कुठून कुठे जातात त्याची माहिती देते….तो तिला “थॅन्क यू” म्हणतो. युवती पुन्हा एकदा त्याच्याकडे स्मित करून आपली गाडी तिच्या रस्त्याला घेते. गाडी वळत असताना चक नोलॅन्डचे लक्ष त्या व्हॅनच्या मागील बाजूस जाते….तिथे त्या पंख पसरलेल्या दोन एन्जल्सचे चित्र असते. म्हणजे ज्या बेटीना पीटर्सनला आपण पार्सल द्यायला आलो होतो तीच ही युवती. थांबवावे का तिला आणि सांगावे का सारे माझ्याबद्दल….असा विचार त्याच्या मनी येतो का ?….इथे चक ने काय निर्णय घ्यायला हवा होता हे दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिसने प्रेक्षकावर सोपविले आहे. चार रस्ते तसेच उजाड पसरले आहेत….आणि चक नोलॅन्ड एकदा त्यातील तिन्ही रस्त्यांकडे पाहतो व न्ंतर बेटीना ज्या रस्त्याने तिच्या घरी गेली आहे त्या चौथ्या रस्त्याकडे टक लावून पाहात उभा आहे…आणि चित्रपटाचा शेवट होण्यापूर्वी तो आपल्याकडेे पाहून मंद स्मित करतो. याचाच अर्थ त्यालाही वाटत असेल की बस्स झाले…एकट्याने आयुष्य काढले…प्रेयसी थांबली नाही आपल्यासाठी…..कदाचित ही बेटीना आपली होऊ शकेल का ? कारण तिचाही घटस्फ़ोट झाला आहे.

cast-away

इथे प्रश्न उभा राहतो समोर की चक नोलॅन्डला कसे समजले की बेटीना या युवतीचा घटस्फ़ोट झाला आहे ? या बेटीनाविषयी माहिती घेणे आता आमच्यासारख्या चित्रपटप्रेमींना क्रमप्राप्त झाले होते. कास्ट अवे चा शेवट कुठे होतो हे मी वर सांगितले आहेच, तर विशेष म्हणजे “कास्ट अवे” चित्रपटाची सुरुवातदेखील याच चार रस्त्याच्या दृश्याने होते हे नोंद करणे जरूरीचे आहे. टायटल्सपूर्वी फ़ेडएक्सचा ट्रक डिक एन्ड बेटीना इस्टेट व कारखान्याकडे जाताना दाखविला आहे. तिथे एकटी बेटीना वेल्डिंग वा शेपिंगचे काम करताना दाखविले आहे. ती आपले पार्सल फ़ेडएक्सच्या कामगाराकडे देते. तिने ते रशियात कामासाठी गेलेल्या नव-यासाठी पाठविले आहे. दुस-या प्रसंगी रशियातील फ़ेडएक्सचा कर्मचारी डिकीच्या तेथील घरात जाऊन ते पार्सल त्याला सही घेऊन देतो. त्यावेळी प्रेक्षकांना समजते की हा डिकी आता रशियातील एका तरुणीसोबत राहात असून त्याला आता बेटीनाशी काही संबंध ठेवायचे नाही. किंबहुना तिने काय पाठविले आहे याची तो पर्वाही न करता ते पार्सल जसे आले आहे तसेच ते तिच्याकडे परत जावे म्हणून पुन्हा जसेच्या तसे फ़ेडएक्स डेपोकडे पाठवून देतो. नंतर तेच पार्सल अमेरिकेतील डेपोत येते आणि त्यावर शेरा असतो “पाठविणा-याला परत”. नेमके ते पार्सल डिलिव्हरीसाठी अन्य पार्सल्सच्या बॉक्सेससमवेत चक नोलॅन्ड ज्या विमानाने त्याच्याकामासाठी प्रवास करणार आहे त्या विमानात येते….अपघातानंतर सारी पार्सल्स समुद्रात विखुरले जातात.

parcel

प्रश्न असा की चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कित्येक वर्षे कुणालाही समजले नव्हते की त्या पार्सलमध्ये नेमके काय पाठविले होते बेटीना पीटर्सन या स्त्री ने आपल्या नव-यासाठी. त्या निर्जन बेटावर चक नोलॅन्ड पंख असलेल्या प-यांचे पार्सल फ़ोडत नाही असे दाखविण्यात आले. पण प्रत्यक्षात दिग्दर्शक आणि लेखकाने कथानायक चक नोलॅन्ड ते पार्सल फ़ोडून त्यात काय आहे हे पाहतो आणि त्यासोबत बेटीनाने लिहिलेले पत्रही वाचतो असे एक वेगळे शूटिंग करून ठेवले होते….झेमेकिसने ते स्वत:जवळ ठेवले होते.

बेटीनाने लिहिलेले असते, “…You said our life was a prison….dull…boring…empty. I can’t begin to tell you how much that hurt. I don’t wish to hurt you. I am enclosing some salsa, the Verde you like. Use it on your sticky rice and think of home. Then come home – to me. We will find the spice to our lives again…together. I love you…always… Bettina….”. (२००० साली आलेल्या चित्रपटात हे पत्रमजकुराचे दृश्य दाखविण्यात आलेले नाही…मात्र २०१५ साली रॉबर्ट झेमेकिसने हे दोनतीन मिनिटाचे दृश्य यूट्यूबवर प्रकाशित केले. तिथून हा पत्राचा मजकूर मी घेतला आहे.) मूळ संहितेत हा मजकूर चक नोलॅन्डने वाचला असल्यामुळे त्याची खात्री असते की या चार वर्षात त्या दोघांचा घटस्फ़ोट झाला असून बेटीना एकटीच टेक्सासमधील व्यवसाय चालवित असणार….म्हणून त्याची त्या चौथ्या रस्त्याकडे जावे का ? अशी मनाची स्थिती झालेली आहे. पण नंतर चित्रपट प्रदर्शनापूर्वी दिग्दर्शक व लेखकाने ते पार्सल न फ़ोडण्याचे दाखवावे असा निर्णय घेतला आणि शेवटासंदर्भात सारे काही प्रेक्षकांवर सोपवून दिले व चक नोलॅन्ड त्या रस्त्यावर उभा आहे…न निर्णय घेतल्याच्या अवस्थेत आणि चित्रपट संपतो. चित्रपट गाजला तो टॉम हॅन्क्सच्या बेटावरील वास्तव्या दरम्यानच्या अभिनय कौशल्यामुळे आणि अतिशय देखण्या अशा चित्रिकरणामुळे. चर्चा त्याचीच जास्त होत राहिली. शेवटाचा अर्थ काय याकडे त्यावेळी जास्त लक्षे दिले नव्हते मात्र समीक्षक आणि चित्रपटप्रेमीमध्ये चर्चा चालू होत्याच. झेमेकिसने खुलासा केल्यावर त्याला आता पूर्णविराम मिळाला.

–  अशोक  पाटील, कोल्हापूर


4 Comments on ““कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट ? एक गूढ… शोध आणि तर्क”

  1. माझा लेख तुम्ही इथे प्रसिद्ध केल्याबद्दल तुमचे खास आभार, शैलेन्द्र जी. तुमच्या ब्लॉगच्या भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    1. खूपच आवडला हा चित्रपट…. खास टॉम हँक्स साठी मी हा चित्रपट डाऊनलोड करून पाहिला.. त्याच्या सेविंग प्रायव्हेट ऱ्हानमुळे त्याच्या अॅक्टींगचा फॅन झालोय.. कास्ट अवे ह्या चित्रपटातील त्याची मेहनत वाखण्याजोगी आहे. कास्ट अवेचा शेवट मला ही गोंधळात टाकून गेला, पण त्याच उत्तर इथे आपल्या लेखात मिळालं… धन्यवाद.
      Tom Hanks च्या अभिनयाबद्दल लिहण्यापेक्षा त्याचा अभिनय पाहणं आणि दाद देणे एवढंच मी करू शकतो.. अजूनही त्याचे बाकीचे चित्रपट पाहायला उत्सुक आहे.

      1. धन्यवाद कुणाल. आनंद झाला मला तुम्हाला कास्ट अवे मधील टॉम हॅन्क्स आणि त्याची त्या मागील मेहनत आवडली. खूप गुणी अभिनेता आहे आणि विशेष म्हणजे तो जी भूमिका पडद्यावर साकार करतो, जणू तीच त्याच्या दृष्टीन प्रथम क्रमांकाचीच आहे की काय असे वाटते. सेव्हिंग प्रायव्हेट रायनचा उल्लेख आवडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *