“क्लिओपात्रा” इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी

“क्लिओपात्रा”…. इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी

क्लिओपात्रा…. इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी :

 

क्लिओपात्रा“…. इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी म्हणून जितकी गाजली त्याहीपेक्षा तिच्या दैवी सौंदर्यामुळे ती जगात ख्याती प्राप्त झाली होती. शतकानुशतके तिच्यासंदर्भातील आख्यायिकांनी साहित्य, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रे गजबजून गेली होती…आजही जात आहेत. विविध देशातील अनेक चित्रकारांनी आपल्या कुंचल्याद्वारे तिचे सौंदर्य शुभ्र कागदावर झळाळत्या रंगांनी रंगवून तिला अमर केले आहे. हॉलीवूडदेखील क्लिओपात्राला विसरणे शक्य नाहीच. १९३४ मध्ये क्लॉडेट कोलबर्ट, १९४५ मध्ये व्हिव्हियन ली, १९५३ मध्ये सोफ़िया लॉरेन अशा सौंदर्यवतींनी त्या त्या दशकात क्लिओपात्रा पडद्यावर साकारली. या सर्वांपेक्षा सर्वत्र गाजली ती १९६३ मध्ये एलिझाबेथ टेलरने साकार केलेली “क्लिओपात्रा”. तिच्या विलक्षण अशा सौंदर्यामुळे त्या भूमिकेला जो रुबाब आला तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. १९६२ मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होतानाच निर्माती कंपनी फ़ॉक्सने जाहिरातीसाठी ज्या काही योजना आखल्या होत्या त्यापैकी एक होती ’एलिझाबेथ टेलर म्हणजेच क्लिओपात्रा’. त्या अनुषंगाने त्यानी नेटिव्ह अमेरिकन चित्रमालेमुळे प्रसिद्धीस आलेल्या हॉवर्ड टर्पनिंग याला करारबद्ध केले. हॉवर्डने हे काम स्वीकारले आणि नंतर अतिशय प्रसिद्ध झालेले “Royal Portrait of Elizabeth Taylor as Cleopatra” हे चित्र तयार केले.

चित्रात क्लिओपात्रा सम्राज्ञीच्या पेहरावात असून बाजूला ज्युलिअस सीझर आणि मार्क एंटनी आहेत. पडद्यावर या भूमिका अनुक्रमे रेक्स हॅरिसन आणि रिचर्ड बर्टन यानी साकारल्या आहेत. त्यानाच हॉवर्डने आपल्या चित्रासाठी वापरले. शुद्ध सोन्याच्या सिंहासनावर क्लिओपात्रा जगजयती राणीच्या रुबाबात विराजमान असून, डोक्यावर हिरेमाणकाने मढविलेला मुकुट दिसतो. सम्राज्ञीच्या दोन निशाणी (ज्याला इंग्रजीत Flail and Crook of Osiris अशी नामे आहेत…इजिप्तच्या राजाच्या आठवणीसाठी ह्या दोन निशाणी त्यापुढील पिढी दंड रुपातील आयुधाद्वारे वापरत असत असे मिथक आहे. याबाबत अधिक माहिती पाहावी लागेल. माझ्या वाचनात परंपरेचे हे रुपडे आले आहे.) छातीशी धरून ती थाटात साकारली गेली आहे. अमेरिकेत १९६३ मध्ये हे चित्र फ़ार चर्चेत होते…”लाईफ़” ने खास क्लिओपात्रा चित्रपटावर अंकही काढला होता. त्यात हॉवर्डच्या चित्राचा अर्थातच कौतुकास्पद उल्लेख होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जाहिरात बाजारपेठेतून कंपनीने चित्र आपल्या दप्तरी ठेवून दिले होते आणि तब्बल ३५ वर्षांनी त्याची जाहीर विक्री झाली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *