गुंतवळ Guntwal

एक कथा…..”गुंतवळ….”
एक कथा…..गुंतवळ…. Guntwal जी.ए.कुलकर्णी…एक असे नाव जे घेताच मराठी वाचकाच्या मनात त्यांच्या कथालेखनाविषयीची कल्लोळ आकार घेऊ लागतो. योजनारहित जीवनातील सर्वव्यापी सूत्रहीनता आणि ललाटी आलेले पण परिस्थितीनुसार ते उघड्या डोळ्यांना कधीच न दिसणारे, दिसेल तेव्हाच त्याचे परिणाम पदरी पडल्यावरच अशी अव्याहतपणे भेटत जाणारी पात्रे. चारचौघातीलच आणि तशीच आहेत ती वरवर पण विलगतेच्या ज्या अनेक पातळ्या आहेत त्यात जी.ए.त्याना शोधत असतात. जणू काही ही पात्रे एक विशिष्ट शापित जीवन जगत आहेत…त्यात वाचक स्वतःला न्याहाळू पाहतो आणि प्रसंगी चटका बसताच दूरही होऊ पाहतो…इतकाही दूर नव्हे की जी.एं.च्या जादूमय साम्राज्यापासून कायम लांब राहाण्याची कामना मनी व्हावी ! होत नाही तसे….जी.ए.कुलकर्णी हे एक असे गारूड आहे ज्यांच्या कथासाम्राज्यात असलेल्या निळ्याकाळ्या डोहाकडे विलक्षण आवेगाने वाचक खेचला जातो….त्यात तो डुंबतो आणि बाहेर येण्याचा यत्नही त्याला करवत नाही, किंबहुना त्यातच तो एक अनोखे विश्व शोधत राहतो…पात्राचे नव्हे तर स्वतःचे.

जी.ए.कुलकर्णीचे कथाविश्व माणसांनी भरलेले आहे असे म्हणण्यापेक्षाही त्या पात्रांच्या नशिबी आलेल्या भोगाने ते गच्च भरलेले आहे. भोग शब्दबद्ध करताना त्यातील प्रतिमांच्या झोताने वाचक भेलकांडून असा जातो की त्याला वाटू लागते अशी दुसह्य स्थिती आपल्या कपाळी तर नाही ना ? माणूस तर आहेच पण जीएंच्या कथांतून वनस्पती आणि प्राणिसृष्टी यानीही आपले स्वतःचे असे स्थान मिळविले आहे. कथानक बहुविध आणि सचेतन व्हावे इतके ते संपन्न आहे….अर्थात माणूस काय, वनस्पती काय किंवा प्राणी काय….याना श्वसन आहे म्हणून जीव आहे, भूक आहे म्हणून भावनाही आहेत. मुख्य पात्राच्या सुखदु:खाशी ते समरस होतात…प्रसंगी मदत करतात….भोगही भोगतात. ही सारी जिवंतपणाची लक्षणे होत. पण हेच जी.ए.कुलकर्णी जेव्हा एका उजाड रखरखीत, उन्हाने रटरटत असलेल्या गावाहून लांब अस्ताव्यस्त पसरलेल्या माळालाच नायक करून त्याच्या सोबतीने घडत असलेल्या जीवनाला जिवंत करतात त्यावेळी त्या कथेतील संघर्षाने…वरवर पाहायला गेले तर जीवघेणा नसूनही…वाचकाला बांधून ठेवतात, त्यावेळी या लेखकाच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावे असे वाटते…नव्हे, वाचक होतोच….. ती कथा “गुंतवळ”.

“सत्यकथा” मासिकाच्या जुलै १९५५ च्या अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा. आज ६० वर्षे पूर्ण झाली या कथेला. मी जवळपास १०० वेळा वाचली असेल आणि हा लेख लिहिताना रात्री परत वाचली….मला परत त्यातील तप्त वातावरणाचा चटका नव्याने बसला. उजाड माळावर रणरणत्या उन्हातील लालभडक ज्वालेवर होऊ घातलेल्या धरणाच्या कामावर जखमी विव्हल सर्पासारखी मंद हालचाल करणारे ते रोजंदारीवर काम करणारे शेकडो मजूर स्त्री-पुरुष, भडक वातावरणावर आपसूक चिकटलेल्या त्या काळ्या आकृत्या, तोंडातून शब्द नाहीत, डोक्यावर पाट्या, चटकपटक करीत कुतरओढीने पुढे नेणारे ते हतबल पाय, हताश, गोंधळलेले सुपरव्हायझर्स, सरदारजीचा ड्रेजर, त्याच्या चालीने भुसभुशीत होणारा मोठा ढेकळा, निर्विकार ड्रायव्हर, ऊन्हालादेखील चराचरा कापणारे एखाद्या लहान मुलाचे भुकेल्या पोटीचे आक्रंदणे, कामगाराच्या सततच्या पहारी आदळणामुळे दगडाखालून धडपडत चारी बाजूंनी जीवाच्या भीतीने पसरणारे रंगीबिरंगी किडे…..हे कसले चित्र ? कशासाठी जमला आहे हा माहोल त्या उजाड भगभगीत माळावर ? हजारो तोंडांनी इतस्ततः अथकपणे राबणारी ती माणसे….त्याना सामावून घेणारा तो अजस्त्र माळ…त्यावर आग ओकणारे ऊन….एक आकृती…एक पुंजका…अर्थपूर्ण वा अर्थहीन गिचमिड….वारा सुटतो, पुंजकी एकत्र येतात कुठल्यातरी कारणास्तव….दोन भाग पडतात, एक मजूरांचा तर दुसरा धरणकामावर नोकरी करणा-या पाचसहा कारकुनांचा….आणि ती वेळ असते चहाच्या सुट्टीची…. दोन गट, दोन वेगळी ठिकाणे…माळावर वसलेल्या एका झोपडीवजा हॉटेलात ही कारकून मंडळी आली आहेत….पुंजक्यांची निर्माण झालेली गुंतवळ सोडवायला….एक धागा बाहेर जातो, पलिकडून दुसरा येतो…निर्विकारपणे…एकमेकाशी संबंध कसलाच नाही….अशी ही गुंतवळ….आतडे आहे पण आतड्याची नाही ओढ.

ही कथा आहे एका दिवसाची…कामाचा दिवस….काम चालू असले तरी आता विश्रांतीची वेळ झाली आहे. कथेची सुरुवातच कशी रखरखीत आणि डोळ्यावर ऊन्हाचा तडाखा आणणारी आहे हे जी.ए.च करू शकतात….

“…रस्त्यापासून चांगल्या सातआठ मैलांच्या अंतरावर दोन नकट्या टेकड्यांआड धुळीत पसरलेल्या कुत्र्याप्रमाणे मुदवाड खेडे पसरले होते. चारसहा झोपड्या, वसावसा ओरडणारी कुलंगी कुत्री, अशक्त हडकुळे बैल आणि हाडांच्या गाठीवर कातडे ताणलेल्या अंगाचे शेतकरी या सार्‍यांचा तो एक गुंतवळाच होता. तेथून लांबवर, एखाद्या जुनेर्‍याप्रमाणे पसरलेल्या धुळीच्या आंधळ्या पसार्‍यावर मध्येमध्ये लिंबाची किरटी झाडे विकल उभी होती. अशा आठदहा झाडांच्या आड मोठमोठ्या ढेकळांचा पुरळ उठलेले एक शेत उसवून पडले होते. त्याला पाठीशी घालून गवती छपराची एक बोंदरी झोपडी उभी होती व तिच्या फाटक्या वळचणीतून मळकट, चेंगट धूर बाहेर पडत होता. मुदवाडच्या जवळ चाललेल्या धरणकामाच्या जागेवरील ते सुभाष हॉटेल होते….”

~ या हॉटेलमध्ये चहासाठी कारकून मंडळी येत असतात. कथेची ही सुरुवातच इतकी भगभगीत आहे की वाचक त्या माळावर थबकतोच. पुढील कथानकात काय असणार आहे त्याची झलक या पहिल्याच उतार्‍यात प्रकट होते. टेकड्या नकट्या आहेत…धुळीत पसरलेल्या कुत्र्यासारखे मुदवाड गाव…..झोपड्या चारसहाच आहेत, तिथेही वसावसा ओरडणारे कुलंगी कुत्री आहेत, लिंबाचे आहे झाड पण ती किरटी असून विकल आहेत…ही स्थिती तेथील उदासीनता अधिकच गहिरी करते..गवती छपराची बोंदरी झोपडी….तिची वळचणही फाटकी आहे…इतकेच नव्हे तर हॉटेल कंत्राटदार सदुभाऊ आणि त्याची बायको राधाबाई चहा खाण्याचे पदार्थ करताना चुलवाणातून निघणारा धूरही मळकट आणि चेंगट आहे….हे वातावरण माळरानावरील कर्कश, तप्त जीवनावर योग्य असे भाष्य करतेच तर त्याच्या जोडीला खाली नाक फेंदारलेल्या लाल बेडकाप्रमाणे दिसणारे बुलडोझर मध्येच गुरगुरत हिंडत, दूर ड्रेजरच्या प्रचंड दातांनी उभ्या टेकड्या विस्कळीत कार्यात मग्न दिसतील….मजुरांच्या रांगा अस्ताव्यस्त भरकटलेल्या हालचाली करीत आहेत आणि ते सारे निर्जीव चेहर्‍यांनी एकमेकाशी चिंध्या लटकल्याप्रमाणे दिसत आहेत…हे चित्र पाहाणार्‍यांच्या मनी कसलाही आनंद हर्ष निर्माण करू शकत नाहीत…त्याला कारण तो अंगावर येणारा माळ आणि तिथे निर्माण झालेल्या नसलेल्या नात्याची गुंतवळ….तीमधून नाही बाहेर पडता येत.

“गुंतवळ” मधील सर्वव्यापी गर्दीतील ते कथानक असूनही एक विलक्षण अंगावर येऊ पाहाणारा एकाकीपणा असून तेच कथेचे केन्द्र बनले आहे. स्थलकालदृष्ट्या एकमेकांच्या अगदी निकट राहाणार्‍यांमध्येही कसलाही अनुबंध नाही…ओढ नाही. धरण बांधकाम पूर्ण झाल्यावर तिथे नंदनवन फुलणार आहे असे दर्शविणारा नकाशा आणि चित्रे डे.इंजिनिअर यांच्या ऑफिसमध्ये लावलेले आहे; पण आत्ता या क्षणी तिथे भगभगणार्‍या उजाड माळावर मजुरांच्या असंख्या रांगा आणि मशिन यांच्या आवाजाशिवाय काही नाही. एका महान कार्यात आपण भाग घेत आहोत याची जाणीव कुणाच्याच मनी नाही, त्यांच्या बधिर मनाला त्याचा स्पर्श नाही. सकाळी त्यांच्या नावापुढे रजिस्टरमध्ये खूण होताच त्या लहानशा धक्क्याने त्यांच्या जीवनाला गती मिळते व ओव्हरसीयरने मान हलविली की त्यांच्या एका दिवसाला संपल्याची गाठ पडते. त्यांच्या दमलेल्या डोळ्यांत वणवणत्या उन्हाची झळ आहे, तर पोटाला आता भुकेची धार आहे. चार वाजेपर्यंत मजूरांच्या सोबतीला बाजूला असलेल्या बांधलेल्या धरण कार्यालयात सारे कारकून व ओव्हरसीयर दिसत…..मात्र चार वाजता सार्‍या पांढरपेशांची गर्दी सुभाष हॉटेलमध्ये होत असे व तेथे नवीन चैतन्य दिसे.

सायंकाळी चार वाजता तेथील टपालाची वेळ असते. त्या सुमारास कोणीतरी एकदम चिमटल्याप्रमाणे ते झोपडी हॉटेल डोळे उघडून बसत आणि इतका वेळ मरगळून बसलेला फोनो कर्णा उभारून रेकूनरेकून दोन फिल्मी जीवांचे आंबलेले प्रेम ओकू लागत असे. जी.ए. यानी केलेले तेथील वातावरणाचे हे वर्णन म्हटले तर भकास म्हटले तर अपरिहार्य….तसेच आता हॉटेलमध्ये जमा होणारी ती कारकून मंडळीही तशीच….देशपांडे, जोशी ओव्हरसीयर, वर्कशॉप सुपरिंटेन्डेन्ट कृष्णस्वाई, परांजपे, साळवी कारकून आत टेबलपाशी येतात आणि धुळीने भरलेल्या हॅट्स खाली टाकून दोन खुर्च्या व एक बाक यावर जणू कोसळतातच. चिखलाचा गोळा धप्पदिशी खाली टाकावा त्याप्रमाणे पडलेली शरीरे मोडून हालचाल न करता स्तब्ध बसून राहतात…कोणत्याही कारकूनाला दुसर्‍यामध्ये भावनेची कसलीही गुंतवळ नाही…जमलो आहोत नोकरीसाठी ह्या भगाट माळावर यापरते दुसरे नाते नाही. वेळ आहे चहाची टपालाची म्हणून पाय ओढत तिथपर्यंत एकमेकाच्या संगतीने आलो आहोत यापरते दुसरा संबंध नाहीत….चहामध्ये कुणालाच तसे स्वारस्य नाही तसल्या जळक्या उन्हात…वाट पाहायची आहे त्या अमीन डाक शिपायाची….पोस्ट खात्याने दिलेला लालभडक शर्ट घालून येणार्‍या, कोणीतरी ते ओतत असल्याप्रमाणे समोरच सारे दात गोळा झालेल्या अमीनला हातात टपालाची पिशवी घेऊन येताना पाहणे हा या कारकुनांच्या भगव्या आयुष्यातील एक उत्कट क्षण असायचा.

तो अद्यापि यायचा आहे….कारकून मंडळी आहेत चूपचाप कारण कुणाकडे काही बोलायला असा विषयच नाही. रखरखत्या दगडधोंड्यांच्या संगतीत त्यांची वाचाही बसलीच आहे. आता सार्‍या बरगड्या निर्लज्जपणे दाखवणारे हडकुळे कुत्रे झोपडीपुढे पडून आहे. अध्येमध्ये विव्हळते, कशामुळे कुणास ठाऊक पण साळवी एक पैशाला मिळणारे लाकडासारखे घट्ट बिस्किट कधीतरी त्याच्यासमोर फेकतो…कुत्र्याने असहाय्यपणे शेपटी हलविणे आणि साळवीचे एकाकी दु:खी मन…ते त्या भकास माळावर एखाद्या मरत असलेल्या सरड्याप्रमाणे पडले आहे. कृष्णस्वामीच्या कपड्यावर तेलाचे मोठमोठे डाग पडले आहेत व त्यावर धूळ पडल्यामुळे त्याला नायटा झाल्यासारखेच वाटते आहे. देशपांडेला बुटांची सवय नाही त्यामुळे आत पायाच्या बोटावर फोड उमटले आहेत. तो बूट काढतो, भोके पडलेले पायमोजे सोलून बाजूला टाकतो….जमत नाही तरी वरून फुंकर घालतो…त्याच्या हालचालीकडे जोशी चिडूनच पाहात आहे. असल्या निबर वातावरणाची त्याला उबग आली आहे आता. जळत्या माळाकडे पाहून अशा निर्लज्ज, भेंडाळलेल्या चित्राखेरीज इथे दुसरे काहीच पाहायला मिळत नाही. भेटेल तो माणूस फक्त “काय उकाडा आहे !” या खेरीज काहीच बोलत नाही. दररोज दाढी करून कामावर जाताना वेगळे कपडे आणि सायंकाळी फिरायला जाताना सिल्क शर्ट पनामा विजार असा पोषाख करणारा जोशी दोन आठवड्यात करपून जातो…बोडका माळ आणि अर्ध्या तासात अंगावर चढणारी बोटभर पांढरी धूळ पाहून त्याचे मनच आटले. दिवस कसातरी ढकलणारा जोशी रात्र झाली की केवळ चार पैसे देणार्‍या नोकरीसाठी आपण अशा परक्या तिरसट मुलुखात येऊन फसलो, ही जाणीव अनावर होते अ निवळ भाबड्या, असहाय, कोंडून राहिलेल्या चिडीमुळे त्याचे मन रडकुंडीला येते. त्याला बी.ए. होऊन एखाद्या छोट्या शहरात मास्तर व्हावे; तुळशीला स्तब्धपणे शालीन मंजिर्‍या याव्या तसे आयुष्य घालवावे असे वाटे. आवडीच्या विषयावर कुणाशीतरी भरभरून बोलता यायला हवे असे त्याला वाटे असे त्याचे स्वप्न…पण मास्तरकीपेक्षा जास्त पगार देणारी ही नोकरी आली खरी, पण त्याचबरोबर वाट्याला आले हे भयाण आंधळे आयुष्य; असले दैत्यासारखे निर्बुद्ध वाटणारे सहकारी कारकून मित्र.

गुंतवळ्यातील ही पात्रे प्रातिनिधीक आहेत एका व्यवस्थेचे…जिथे असहाय्य अशी अपरिहार्यता आहे. प्रेम, माया, आपुलकी, सुशीलपण, आपलेपण औषधालासुद्धा मिळणार नाही…नोकरीमुळे झाली आहे ओळख, बस्स इतपतच. मग या कारकुनांच्या सोबतीला आहे हॉटेल चालविणारा सदुभाऊ. आत काळवंडलेल्या स्वयंपाकघरात एका बसकुर्‍यावर त्याची बायको राधाबाई भजी तळत आहे. तिला सारेजण कोकणी म्हणत. तिच्याभोवताली पिवळ्या फिकट भज्यांचा ढीग पडला आहे आणि त्यांच्या तेलकट वासाने दाट कोंदलेली झळ त्या झोपडीत आता मावेनाशी झाली आहे. चेहर्‍यावर घामाचे थेंब व त्यावर हलकेच मुलाम्याप्रमाणे पसरलेला जाळाचा लालसरपणा. सायंकाळी काम संपवून मजूर घरी चालले की त्यांना पत्रावळीच्या तुकड्यावर चारचार भजी देताना त्यांचा बारक्या नोकर पांड्यांची तारांबळ उडत असे. मिरजी भजीतील तिखटपणा कमी झाला असेल तर ते मजूर पांड्याला चारसहा रसरशीत शिव्याही हाणीत. पांड्याला त्या शिव्या समजत नसत पण उत्तरादाखल तोही एक हलकीच जातिवंत शिवी ठोकत असे. त्यालाही ह्या हॉटेलात राह्यचे नाहीच. तोही कोकणातील त्याच्या घराकडून येणार्‍या पत्राची उत्सुकतेने वाट पाहात आहे…कारण त्याला गावाकडे घेऊन जायाला त्याचा बाप येणार आहे.

अशी अनेक पत्रे त्या अमीनकडे आहेत की काय असेच वाचकाला वाटत राहते. त्यामुळे प्रत्येकाच्या दुखण्यात तोही आपसूकच मिसळला जातो आणि त्यांच्याइतकाच तोही त्या पोस्टमनची वाट पाहात आहे आता. दरम्यान डे.इंजिनिअरच्या क्वार्टर्सकडे सार्‍या कारकुनांचे लक्ष गेले आहे. आठवले इंजिनिअर यांची बायको बाहेर वाळत घातलेले कपडे नेण्यासाठी आली आहे. तिच्या हालचालीत एक धूर्तपणा आहे. ती एक स्त्री आहे या पलिकडे तिच्यात विशेष असे काही नसूनही या समस्त कारकुनांना आपल्या डोळ्याची एक भूक भागवायची आहे. आठवलेच्या बायकोला हे काही नवीन नाही त्यामुळे तिच्याही हालचालीत एक नखरा आहे…कारकुनांना त्या क्वार्टरसमोर पातळाचा रंग दिसला म्हणजे त्यांचे मन वस्सदिशी उठे….पण आता ती आत गेली आणि इतका वेळ टांगलेली मने सैल झाली आहेत…विझून गेलेल्या सिगारेटप्रमाणे निर्जीव झाली आहेत.

अमीन अजून आलेला नाही….काहीतरी चावत बसायचे म्हणून देशपांडे शेवेची प्लेट जवळ ओढतो…दोन काड्या तोंडात टाकतो…पण लागलीच त्याला त्या मऊ बेचव पिठाचा त्याला कंटाळा येतो…त्यातूनच तो ओरडतो, “पांड्या, लेका ही शेव आहे की तुझ्या बापाची दाढी आहे ? चल उचल आणि ब्रेड घेऊन ये…” पांड्याला हे नित्याचेच आहे त्यामुळे तो खिंकाळून म्हणतो, “आता ब्रेड कुठला साहेब….सरदारजी गेले आणि ब्रेडही गेला !”. सरदारजीच्या उल्लेखाने तिथे जमलेले सारेच कारकून अस्वस्थ होतात. सरदारजी हा शीख ड्रेजरवर काम करीत असे. पंजाबातून आलेला हा सरदारजी त्याने फाळणीच्या उत्पातात घराणे मातीमोल झाल्याचे पाहिले…डोळ्यासमोर घरातील सार्‍यांजणांवर गोळ्या घातलेल्या त्याने पाहिल्या होत्या…तरीही धगधगीत आठवण राहिली होती त्याच्या धाकट्या कुशवंती नामक अप्सरेसारख्या पोरीची. कुशवंती म्हणजे सार्‍या घरातील डाळिंबाची कळीच होती. खुद्द सरदाराच्या रेशमी कपड्यांपेक्षा तिच्या पायातील सपाता जास्त मूल्यवान असत. चिक्कनच्या पडद्याखेरीज तिच्या चेहर्‍यावर सूर्याचे किरण कधी पडले नाहीत. वाळ्याच्या कोमल गंधाखेरीज वारा तिच्या शुभ्र उरोजाला लागला नाही. फाळणीत सारे काही उद्ध्वस्त, भग्न, मलिन झाले…..वाड्यात जेथे पाऊल टाकताना नबाबांना आनंद व्हावा तेथे आता कल्हईवाल्यांनी पथार्‍या पसरल्या. दंगल्र घालणार्‍यांनी एकट्या सरदारजीला मात्र मुद्दामच सोडले…ते बधिर होऊन अगदी मेलेल्या मनाने खाली सरकतसरकत या मुदवाडला आले. सुन्नपणे तिथेच आयुष्य काढू लागले. ड्रेजरवर चालक म्हणून कुणाशीही न बोलता दिवसरात्र काम करू लागले…आणि एक दिवशी त्याच ड्रेजरच्या दांड्याखाली उभारून त्यानी आपल्या जीवनाची अखेर करून घेतली. सार्‍या आठवणी जाग्या झाल्या सार्‍यांच्याच आणि आता ते पुन्हा जास्तच उदास झाले. सदुभाऊ गप्प आहेत. पांड्या इकडेतिकडे करत आहे…जोशीचे उदास मन सरदारजीच्या आठवणीन भिजले आहे, कृष्णस्वामी गप्प झाला ही. देशपांडे शेवेची काडी चघळत आहे…आणि सुभाष हॉटेल आता भट्टीत अंडे उकडून ठेवून बघत राहावे अशी स्थितीच निपचित पडले आहे.

“तो आला नव्हे काय अमीन..!” पांड्या ओरडतो…”आले टपाल…!”

एवढ्या पुकार्‍याने सर्वांच्या मनी अधीरता गोळा झाली आहेत. कृष्णस्वामी अस्वस्थ आहे. त्याच्या वडिलांचे ऑपरेशन होते व त्याने पाठविलेल्या तारेला काही उत्तर आले नव्हते. पांड्या तर आता दांडीवरच बसल्यासारखा अधीर झाला आहे, त्याला बापाच्या “मी येत आहे तुला न्यायला” मजकुराच्या पत्राची अपेक्षा आहे. सदुभाऊ आणि कोकणीला पत्रात स्वारस्य नसतेच पण तेही दोघे इतरांप्रमाणे अमीनची वाट पाहतात..,,अमीन येताच त्याच्याभोवती सारे कोंडाळे करतात….कृष्णस्वामीकरता केवळ एका शब्दकोड्याचा फॉर्म असलेला लिफाफा आला आहे, तो ते नैराश्येने फेकून देतो. बापाकडून पत्र नाहीच. देशपांडेकरिता एक पत्र होते आणि नटीचे निरनिराळे फोटो असलेले एक कॅलेन्डर. पांड्यालाही पत्र आले आहे…पत्र म्हणताच तो वितळूनच गेला आहे. एक कार्ड आहे, जोशी त्याला वाचून दाखवितो, “आजी फार आजारी होती. मी गाव सोडून मुंबईला जात आहे. तीनचार महिन्यांत येऊन घेऊन जातो…”. पांड्याच्या हातापायांतील जोमच ओसरून गेला आहे. देशपांडेच्या पत्रात केवळ “पैसे पाठव” असाच मजकूर असल्याने तो संतापला आहे…फाडूनच टाकतो तो ते पत्र…मात्र कॅलेन्डरची गुंडाळी सोडून नटीची चित्रे पाहतात त्याचे डोळे आकुंचित होऊन भुकेले होतात…”वा! मस्त, ब्यूटिफूल!” अशी शीळ घालतो. तसल्या उन्हात त्याला ती हवीशी सावलीच भेटते. जिवंत हाडामांसाच्या सोबतीच्या माणसामुळे नव्हे तर आर्टपेपरवर नखरे दाखवित पोझ देणार्‍या त्या नटीमध्ये त्याला हिरवाई सापडते. तो बाहेर पडतो…जोशी स्तब्ध बसला आहे अजूनी. त्याला आजही त्याच्या बहिणीचे पत्र आलेले नाही. तोंड न फुटलेल्या गळवाप्रमाणे त्याची विषण्णता सारखी ठसठसत आहे….उठावे व ताटकन जाऊन पाहून यावे बहिणीला….होईल का भेट ? भीतीचा केसुरकिडा मनी सरपटू लागतो….कुशंकाची वेडीवाकडी भयाण चित्रे नाचू लागतात, केसाळ, कर्कश, आंधळी…पुन्हा जोशीचे मन व्याकुळ होऊन जाते. इतरांनी पर्वा नाहीच नाही.

अमीन पाहतो तर पिशवीत एक पत्र सरदारजीच्या नावाचेही आहे…पण ते आता द्यायचे तरी कुणाला ? कुणी कारकून त्या पत्राला हात नाही लावत….अमीन विचार करतो कसलातरी आणि फाडून टाकतो ते पत्र….पांड्या आता हुंदके देऊन रडत आहे. त्याचे रडणे ऐकून वैतागलेला सदुभाऊ त्याच्या पाठीत बुक्का घालून त्याला “लाग कामाला…” हुकूम सोडतो. … कारकून आपापल्या कामाकडे जातात…सदुभाऊ आता सायंकाळची वाट पाहू लागतो. उन्हात धापा टाकत असलेला माळ आता शांत होतो. शंभर पायांचा किडा सरकावा त्याप्रमाणे मातीच्या ढिगामागून मजुरांची रांग वळतवळत रस्त्याच्या लाल जिभेवरून सुभाष हॉटेलकडे येत आहे…त्यांची ती गुंतवळ रेषा उन्हामुळे जितकी संथ आहे तितकीच सहनशीलही आहे.

जी.ए.कुलकर्णींनी दर्शविलेली ही गुंतवळ उन्हात सुरू होते आणि उन्हे असतानाच थांबते…प्रत्यक्षात थांबलेली नसते तर बिनआतड्याने ते नव्या दिवसाची वाट पाहाणार आहे…उद्याही पुन्हा हाच खेळ….खेळ पुन्हा उद्याही हाच….पुन्हा उद्याही हाच खेळ…मंत्र कसाही म्हणा कितीदाही म्हणा…त्यातून अटळतेचा तोच हुंकार !

“विदुषक….प्रवासी…यात्रिक....स्वामी….दूत…आणि अर्थातच इस्किलार…” यात दिसणारे आणि या कथांमुळेच समीक्षक आणि सर्वसामान्य वाचक यांच्यात अतिशय लोकप्रिय झालेले जी.ए.कुलकर्णी वेगळे आणि १९५० ते १९५५ अशी काळात कोणत्या पातळीच्या कथा लिहित असत याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे त्यांची “गुंतवळ” ही कथा होय. ही कथा एककेन्द्री वा स्थिरकेन्द्री नाही…तर आहे ती गतीहीन झालेल्या स्थितीवर भाष्य न करताही त्यातील रखरखीतपणा जाणवून देणारी…. तुम्ही सर्वांनी ती अवश्य वाचावी अशी विनंती.

निळासावळा या कथासंग्रहातील “गुंतवळ” ही कथा…तर त्यातच आणखीन एक अशीच मन व्यापून टाकणारी कथा आहे…..”चंद्रावळ” ….तीही याच पंक्तीतील….अशा अस्सल मातीतील कथेचा फुलोरा देणारे जी.ए.कुलकर्णी फारच भावणारे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *