चार्ली चॅप्लिन….Charlie Chaplin

चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin)

विनोद आणि विनम्रता….ही दोन गुणवैशिष्ट्ये या महान कलाकाराच्या अभिनयाचेच नव्हे तर त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे घटक बनून सार्‍या जगापुढे येत राहिले होते, वर्षानुवर्षे. मनोरंजन क्षेत्रातील असा एकही भूभाग नसेल या वसुधेवर जिथे हे नाव गेले नसेल. कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नर्तन आदी अगणित अशा कौशल्याने भरून आणि भारून गेलेले हे व्यक्तिमत्व अथकपणे केवळ मुद्राभिनयाने लाखो करोडो प्रेक्षकांसमोर येत गेले आणि पडद्यावर त्या मूकपटाच्या जमान्यात केवळ डोळे आणि ते बालकासारखे हास्य या दोन घटकांनी जगावर राज्य करीत राहिले. राज्य तरी कसले ? तर विनोदी अभिनय पाहता पाहता चित्रपटगृहातील समस्तांच्या डोळ्यातून हमखास पाणीही काढणारे, प्रसंगी. ही विलक्षण जादू वा मिळकत अन्य कुणाला त्याच्या काळात वा त्यानंतर त्याचीच नक्कल करणार्‍या कुठल्या कलाकाराला जमली असेल असे वाटत नाही, असेल जमली तर त्यालाही सलाम करावा. इतकी या नावाची महानता….कोण होते हे महाशय ? व्याख्या वाचल्या यांच्यासंदर्भातील तर दिसून येईल की याना नाव पडले होते “ट्रॅम्प…” तुरुतुरू भटकत राहाणारा, सरळ कधी चालल्याचे दिसून येणारच नाही पडद्यावर… आयुष्य सारे फ़ाटक्या पायाचेच झाले होते आणि ती प्रसिद्ध छडी आणि वारंवार उडून जाणारी एक काळी टोपी….कधी दोन वेळ पोटभर खायाला मिळाले असेल असे वाटत नव्हते आणि मिळाले म्हणून हा संतासारखा आता सुखी समाधानात विचारात मग्न होऊन झाडाखाली झोपी गेला आहे असेही कधी नाही दिसणार….सदैव अस्वस्थ….सदैव कामात…शून्यातून शोध. स्वत:साठी नाही तर दुसर्‍यासाठी त्यातही कुणी गोड मुलगी, सुंदरी असेल तर मग हा तिच्यासाठी चांदण्या आणायलाही कमी नाही करणार. कवी, लेखक, सद्गृहस्थ आणि सदैव स्वप्नाच्या दुनियेत वावरायची आवड बाळगणारा. 

Image result for charlie chaplin

इंग्लिश चित्रपटाच्या इतिहासात इतकी विविध रुपे अन्य कुणी सादर केली असतील नसतील पण एकाच वेळी हास्य आणि अश्रू या घटकांना इतक्या प्रभावीरीत्या सादर करणे ही दुर्लभ घटना. चित्रपट समीक्षकांनी तसेच मनोरंजन क्षेत्राचा इतिहास लिहिणार्‍यांनी या अजोड कलाकाराला “किंग ऑफ़ ट्रॅजेडी” या विशेषनामानेही गौरविले आहे….जे योग्य तर आहेच पण फ़रक इतकाच की चित्रपटगृहात प्रवेश करणारा मनी म्हणत असतो की आज आपण खूप हसणार आहोत या कलाकाराचे काम पाहाताना… तसेही होत असेलच पण बाहेर पडताना हाच रसिक प्रेक्षक त्यालाही नकळत रुमाल डोळ्याला लावत असे…. ही कमाल. आज १६ एप्रिल….ग्रेट चार्ली चाप्लिन यांचा जन्मदिवस…. स्मरण करू या आपण या महान कलाकाराचे या निमित्ताने…..!

 

Charlie Chaplin Reel Strip2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *