निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी….!

निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी….!

निष्पर्ण वृक्षावर भर दुपारीनिष्पर्ण वृक्षावर भर दुपारी….!
लेखक आपली कादंबरी पुस्तकरुपाने प्रकाशित होताना कृतज्ञतापूर्वक ती एखाद्या व्यक्तीस वा संस्थेस अर्पण करतो. वाचक त्या पानाकडे आपली सहज अशी नजर टाकतो आणि मुख्य कादंबरी पानाकडे वळतो. कारण त्यात त्याला जास्त स्वारस्य असते. पण अशीही एखादी कादंबरी केव्हातरी येते आणि तिची अर्पणपत्रिका वाचून वाचक जणू काहीच समजले नाही अशा अवस्थेत तिथे काही वेळ थांबतो. समजून घेण्यासाठी आता कादंबरी वाचलीच पाहिजे असे त्याचे मत होते. ही कमाल केली होती श्री.ह.मो.मराठे यानी त्यांच्या “निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी..” या लघुकादंबरीच्या अर्पणपत्रिकेत. अवघ्या ८५ पानाच्या या कादंबरीला त्यानी अर्पण केले “….हजारोंच्या निबिड आत्मदैन्यास…” ! हे हजारो होते सन १९६८-६९ सालांच्या दरम्यानचे बेकार तरुण. त्या दशकात सायन्सचे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगच्या विचाराने जात होते, तर कॉमर्सचे एकतर उद्योगधंदा वा मग बॅन्किंगसारखी सुखीसमाधानाची नोकरी मिळविणे. बाकी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घ्यायची आणि सरकारी नोकरीत लोअर डिव्हिजन क्लार्कची ११५-२४० वेतनश्रेणीची मिळेल एखादी जागा….रुपये २९७/- पगार…३०० देखील नव्हे, अशा आशेवर एम्प्लॉयमेन्ट एक्सचेंजच्या पायर्या झिजवत बसायचे. यात नाही जमले तर मग बी.एड., डी.एड. करून शाळामास्तराची नोकरी करायची. जे हुशार असतील ते पुढे एम.ए. वगैरे करून प्राध्यापकाची नोकरी मिळते का ते बघत बसत. या दरम्यानचा काळ (पदवी घेतल्यामुळे कॉलेज संपले आणि नोकरी नसल्यामुळे घरात बसण्याची लाज) फ़ार जीवघेणा. रस्त्यात कुणी ज्येष्ठाने विचारले, “काय करतोस रे आता ?…” तर “काका, पाहतोय नोकरी.” एवढेच कसेबसे उत्तर तोंडातून बाहेर पडत असे. “बघा लवकर नोकरीचे आता. दिनकरराव थकले आता. तुझ्या बहिणीच्या लग्नाचीदेखील त्याना काळजी आहेच ना…” ~ या सरबत्तीला हो हो म्हणण्यापल्याड या बेकार युवकाला काहीच करता येत नसे. तर अशा बेकारांची हजारोंची जी संख्या आत्मदैन्याच्या तापाने फ़णफ़णलेली असायची त्यांच्या कथा उद्वेग आणणार्याच. नोकरी दुर्मिळ आणि इकडे चहासाठी पंधरा पैसे (त्यावेळेचा दर) नसायचे खिशात.

अशा स्थितीत एक तरुण….जो पदवीधर आहे आणि टेंपररी म्हणून कुठेतरी नोकरी करीत असलेला. कॉलेजमधील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळलेले आणि त्या स्वप्नमय दिवसात चार पैसे का होईना पण नोकरी होती. त्यानी लग्न केले…संसार सुरू झाला…त्या पाठोपाठ ती गर्भवती राहिली आणि इकडे त्या टेम्पररी नोकरीमध्ये याला नारळ मिळाला. झाला बेकार आणि मग सुरू झाली त्याची दैनंदिन फ़रफ़ट. वसुमती (त्याची बायको) ला “मी ऑफ़िसला चाललो गं…” असे म्हणून खिन्नपणे खोटे सांगून हा बाहेर पडणार आणि ती आपल्या पोटात वाढत असलेल्या बाळासोबत मश्गुल दिवसभर उद्याची सुखद स्वप्ने रंगवत….रात्री त्याची वाट पाहात. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीचा पहिला प्रहर असे चार गट आणि हा फ़िरतोय शहरातून या ठिकाणाहून त्या आणि तिथून तिसरीकडे. चहाची हुक्की आली म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन एक कप कॅडॅक (त्याचा उच्चार…काशिनाथ घाणेकर स्टाईलमध्ये…असे तोच म्हणत असे) आणि चारमिनार सिगारेट….त्या धुराच्या वलयात याचे ठणाणा करणारे मस्तक….आजूबाजूला काय चालले आहे याचा याला पत्ता नाही. माझ्या खिशात आत सहा रुपये आहेत….मी उपाशी आहे. बायको गरोदर आहे…. ती घरी गेल्यागेल्या पैसे मागते….बाळासाठी खूप खूप काही वस्तू घ्यायच्या आहेत…स्वप्ने पाहत्येय ती येडी आणि तिला माहीत नाही की तिचा हा नालायक नवरा शंभर सव्वाशे रुपयाच्या नोकरीसाठी शहरात कुत्र्यासारखा हिंड्तोय. काय करू काय करू ? कुठे जाऊ ? पैसा पैसा पैसा…. अशी किंकाळी मारू का कुठेतरी ? मला वेड लागणार बहुतेक अशा विचारात आहे. सहस्त्रबुद्धे नामक एक ज्येष्ठ व्यक्ती, ज्याच्यासमवेत त्याने मागे नोकरी केली होती काही महिन्यासाठी….ते त्याला हॉटेलमध्ये भेटतात. त्याची ही केविलवाणी अवस्था ते बघतात; पण तेही काहीच करू शकत नसतात. त्यातल्यात्यात चहाचे तीस पैसे ते देतात हे पाहून हा मनातल्या मनात समाधान मानतो….तीस पैसेदेखील आपण खर्च करू शकत नाही ही शरमेची गोष्ट. फ़िरत राहतो…अनेक अनुभव….पुढे तर दाहकच सारे. (ते वर्णन मूळ पुस्तकातून वाचायला हवे म्हणून जास्त तपशील देत नाही.)

“साधना” १९६९ च्या दिवाळी अंकात एका तरुणाची (मुख्य पात्राला काही नाव नाही. पत्नीचा उल्लेख मात्र तो वसू असा करतो तो) ही दीर्घकथा. प्रसिद्ध झाली आणि त्या दिवसात मराठी साहित्यवर्तुळात एक जोरदार वादळच भिरभिरले असे म्हणावे लागेल. खळबळजनक तर ठरलीच इतकेच नव्हे तर वर्तमानपत्रे आणि चर्चेत “कोण हे मराठे ?” असेही विचार उमटले.”साधना” परंपरेत ही कादंबरी कशी काय बसली ? अशीही संतापजनक विचारणा. त्याला कारण म्हणजे ह.मो.मराठे यांची भाषा त्यावेळी अंगावर शहारे आणणारी आहे असे तर सहजी म्हणावे अशी स्थिती होती. शिवाय त्या वेळेच्या समाजावर कादंबरी = मनोरंजन इतकाच परिणाम जाणवत असे. “जीवनवाद” आणि “कलावाद” अशा चर्चेतून फ़डके-खांडेकर-माडखोलकर-पेंडसे-मुक्तिबोध आदींच्या अनेक कलाकृतीतून सर्वसामान्य वाचकाची मनोरंजन किंवा करमणूक यांची भूक भागत असे. पुढे औद्योगिक क्रांतीमुळे चित्र बदलत गेले समाजरचनेचे तसे मग कुतूहल क्षेत्रेही नव्याने समोर आली. मग तेही दिवस आले की केवळ नायक आणि नायिका यांच्या बाग तलाव इथल्या फ़े-यांशिवायही जग आहे त्यातून प्रादेशिक, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रात्मक असे जे ठळक प्रवाह निर्माण झाले त्याचे स्वागत मराठी साहित्यात अगत्याने झाले (हा विषय फ़ार मोठा आणि स्वतंत्र असल्यामुळे इथे लेखकांची आणि संबंधित कादंबर्यांची समग्र नावे देता येणे अशक्य आहे). माणसातील अनाकलनीय संबंध आणि तुटत चालली स्नेहनाती…याला कारण काय असेल याचाही शोध घेणार्या कादंबर्या बाजारात येत गेल्या. पण ह.मो.मराठे यानी “निष्पर्ण….” मध्ये जी कथा मांडली तिची व्यथा (एका दिवसाचीच कथा आहे) आहे ती बेकार तरुणाची असहाय्य स्थिती, त्याचा संताप (ज्याला काहीच अर्थ नसतो, वांझ आहे अगदी….एके ठिकाणी तर त्याला अशा संताप प्रदर्शनाबद्दल इतरांकडून लाथाबुक्क्या मिळतात….हा गलितगात्रच, प्रतिकारदेखील करू शकत नाही….) याच्याकडे आता आहे ते फ़क्त शब्द आणि शब्द. अशा कडेलोटावर असलेल्या तरुणाची त्या स्थितीतील भाषा कशी असेल याचे आपण आजदेखील चित्र नजरेसमोर आणू शकतो. मराठे यानी ते बेडरपणे लिहिले आणि “साधना” ने जसेच्या तसे छापले. वाचकाला तो अनुभव धक्कादायक वाटला पण तो अस्तित्त्वात नाही असे मात्र कुणीच म्हटले नाही, हे एक विशेष.
दिवाळी अंकानंतर….मग ही कादंबरीका कोठावळे यानी पुस्तकरुपात १९७२ मध्ये प्रसिद्ध केली. मराठे यांच्या या कलाकृतीबद्दल ”साधना” अंक आणि इतरत्र त्यावेळी जी मते आणि मतान्तरे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती….तीदेखील मॅजेस्टिक प्रकाशनाने पुस्तकात प्रसिद्ध करून एक चांगले कार्य केले होते (त्याबद्दल त्यांचे विशेष आभार). प्रा.प्रभाकर पाध्ये यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक यानी या कादंबरीला जी प्रस्तावना लिहिली आहे तीत एके ठिकाणी ते म्हणतात, “…मला या कादंबरीचा आवडणारा पहिला विशेष म्हणजे तिच्या शैलीतला जोम – एका व्याकुळ, व्यथित, निराश, चिंताग्रस्त नायकाच्या जीवनात जो जोम अभावानं आढळतो तो त्याच्या कथनाच्या शैलीत शिगोशीग भरलेला आहे. ही सांगड सांधणं मोठमोठ्यांनाही जमलं नसतं, पण मराठ्यांना ते जमलं आहे….” – ही पोच ह.मो.मराठे यांचा साहित्यविश्वातील स्थान पक्के करायला पुरेशी आहे.
“निष्पर्ण….” च्या अविस्मरणीय अशा यशानंतर ह.मो.मराठे यानी विविध लेखन विपुल केले. पण आज त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे माझ्या नजरेसमोर ही कादंबरीका आली (आणि एक “पक्षिणी” नामक कथा…) जिचा परिचय २०१७ मधील नवीन पिढीतील वाचकांना करून द्यावा असे मनापासून वाटले. एक प्रकारे ह.मो. याना ही आदरांजली !

–  अशोक  पाटील, कोल्हापूर

October 3, 2017

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *