“पारो”-सुचित्रा सेन (Paro-Suchitra Sen)

“पारो”-सुचित्रा सेन (Paro-Suchitra Sen)

“पारो” इतर अनेक नायिकांपैकी एक नाव असेच जर म्हटले गेले तर त्याबद्दल कुणी तक्रार करणार नाही; पण दुसरीकडे ज्यावेळी ’सुचित्रा सेन’ नामक बंगालमधील एक तरुणी ही भूमिका पडद्यावर दिलीपकुमारसारख्या सशक्त अभिनेत्यासमोर तितक्याच ताकदीने [काही प्रसंगी त्याच्यापेक्षा सकस अभिनय] साकार करते त्या क्षणीच ती देशातील करोडो चित्रपट रसिकांच्या हृदयी विराजमान झाली. आजच्या युवा पिढीला “सुचित्रा सेन” ह्या नावाशी कोणतीही ओळख नाही हे पाहताना आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कारण या श्रेष्ठ अभिनेत्रीने सन १९७८ मध्ये चित्रपट कारकिर्दीला शेवटचा नमस्कार केला आणि त्यानंतर तिने अगदी कालपर्यंतचे आयुष्य अक्षरश: एकांतात व्यतीत केले. त्या मागील कारणे खाजगी आणि कौटुंबिक असल्याने त्याच्या तपशीलात शिरण्यातही अर्थ नसतो, पण ज्यावेळी सुचित्रा सेनला भारत सरकारने २००५ चे “दादासाहेब फ़ाळके” पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले त्यावेळी तिने त्या खात्याला पुरस्कार स्वीकारण्याबाबत नम्रपणे आपला नकार कळविला. नवी दिल्लीत स्वत: हजर राहून राष्ट्रपतींच्या हस्ते तो पुरस्कार घेणे त्यातील एक अट आहे. तथापि प्रकृती आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून अलिप्त राहाण्याच्या निर्णय यामुळे तिने तो मान बाजूला ठेवला.

मनोरंजन क्षेत्रात अगदी १९५० पासून राजकपूर-नर्गिस, दिलीपकुमार-मधुबाला, देव आनंद-सुरैय्या अशा प्रसिद्ध जोड्या पड्द्यावर तसेच खाजगी जीवनातील चर्चेमुळे रसिकांच्या उन्मादिक चर्चेचा विषय राहिल्या आहेत. बंगाली चित्रपटसृष्टीत अशाच पातळीवर खूप गाजलेली आणि सदैव चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे उत्तमकुमार-सुचित्रा सेन. हे सत्य की त्या दशकातील नायकनायिकेच्या संदर्भातील चर्चा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे जितकी होत असे त्यापेक्षाही या कलाकारांवरच प्रेम करणारा रसिक वर्ग मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या चर्चेद्वारे करीत असे. शारीरिक आकर्षणाच्या रसायनापेक्षा जोडीचा पडद्यावरील अभिनय या चर्चेचा प्रमुख विषय असे.

६ एप्रिल १९३१ रोजी अविभक्त बंगाल प्रांतातील पाभना जिल्ह्यात [जो सध्या बांगला देशात विलीन झाला आहे] हेडमास्तर असलेले वडील दासगुप्ता यांच्या घराण्यात जन्माला आलेली ही ’रमा’ पुढे लग्नानंतर ’सुचित्रा सेन’ बनली आणि त्यानंतरच तिने बंगाली चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे पुढे भारतभर आपल्या अभिनय कौशल्याने गाजलेल्या या अभिनेत्राचा पहिलाच बंगाली चित्रपट ’शेष कोथाय’ पूर्ण झालाच नाही. मात्र १९५३ मध्यी आलेल्या “शरेय चतुर’ [यात उत्तमकुमार नायक होता] आणि ’काजोरी’ या दोन पटांमुळे तिचे नाव बंगालप्रेमींना मनी वसले. इथून पुढे तिची कारकिर्द कधीच खाली आली नाही. एखाद्या राणीसमच तिने बंगाल चित्रपटक्षेत्रात राज्य केले. उत्तमकुमार हा अभिनेता म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत जे स्थान दिलीपकुमारचे तेच स्थान उत्तमकुमारचे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याच्या नायिका म्हणून नंतर सुचित्रा सेनने जे स्थान मिळविले ते सा-या बंगालने डोक्यावर घेतले होते. अभिनय कौशल्य वादातीत होते तिचे आणि लोक केवळ तिच्या सौंदर्यावर नव्हे तर अभिनयामुळेही ही चित्रपटाच्या खिडकीवर तिकिटासाठी गर्दी करत.

हिंदी चित्रपटातील इतिहासात आपण वहिदा रेहमान अभिनित “खामोशी” हा चित्रपट फ़ार उत्कृष्ट आणि गाजलेला समजतो; पण त्या नर्सची भूमिका सर्वप्रथम सुचित्रा सेन हिनेच सन १९५९ मध्ये आलेल्या “दीप ज्वेले जाल” या चित्रपटात केली होती. बंगालमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविलेला हा चित्रपट नंतर असित सेन यानी वहिदाला प्रमुख भूमिकेत घेऊन हिंदीत निर्माण केला. बंगाल भाषेतच निर्माण झालेला “उत्तर फ़ाल्गुनी” ह्या पटाने हिंदीत ’ममता’ नावाने यश मिळविले. इथे मात्र बंगाली आणि हिंदी भाषेत दोन्ही ठिकाणी सुचित्रा सेन मुख्य नायिका होती.

हिंदी चित्रपटसृष्टी प्रत्येक अभिनेत्रीला खुणावत असते पण सुचित्रा सेन हिने आपली कारकिर्द प्रामुख्याने बंगाली भाषेतील चित्रपटावरच केन्द्रीत केली. सन १९५५ मध्ये आलेल्या ’देवदास’ या हिंदी चित्रपटात तिने आपली पहिली भूमिका केली. तिने साकारलेली ’पारो’ चित्रपटाचा केन्द्रबिंदू ठरली आणि दोन नायिका असूनही एकदाही त्या समोरासमोर येत नाहीत किंवा त्यांच्यात एका शब्दाचाही संवाद नाही. अत्यंत संयतपणे साकारलेली पारो…जितकी प्रेमाला आसुसलेली तितकीच देवदासने नकार दिल्यावर संतापाने आणि स्वत:च्या घराचा मान जाऊ नये म्हणून विधुरासमवेत विवाह करून त्याचा संसार नेटका करणारी पारो….देवदासविषयी प्रथम प्रेम आणि नंतर अपार करुणा अशी दोन्ही नाती जपणारी पारो….ही सारी रुपे सुचित्रा सेनने विलक्षण अभिनय सामर्थ्याने साकारली. यानंतर दोन वर्षांनी आलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या “मुसाफ़िर” ह्या प्रयोगशील चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका केली होती. १९६० मध्ये देव आनंदबरोबर “बम्बई का बाबू” हा चित्रपट. यातील एका अल्लड ’माया’ ची भूमिका सर्वांनाच आवडली. गाणीही खूपच गाजली होती या चित्रपटातील. १९६६ मध्ये आलेल्या ’ममता’ चित्रपटाने सुचित्रा सेनच्या अभिनय कौशल्याचा कसच लागला होता. मुलगी आणि आई या दोन्ही भूमिकेतील तिच्या अभिनयाने अशोककुमार आणि धर्मेन्द्र यांच्याहीपेक्षा सरस काम तिने केले होते. तब्बल जवळपास दहा वर्षानंतर म्हणजे १९७५ मध्ये ऐन आणीबाणीच्या काळात आलेल्या “आंधी” चित्रपटातील ’आरतीदेवी’ च्या भूमिकेत सुचित्रा सेनने साकारलेली राजकीय पुढारी म्हणजे जणू काही इंदिरा गांधीच होत्या. परिस्थिती अशी होती त्या साली की जवळपास बंदी येण्याचे घाटत होते; पण तसे झाले नाही आणि सोबतीला संजीवकुमारसारखा चतुरस्त्र अभिनेता असल्याने सुचित्रा सेनचा हा चित्रपट सा-या भारतात गाजला…..पण ’आंधी’ हा तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला.

आंधी च्या अगोदरच तिच्या पतीचे ’आदीनाथ सेन’ निधन झाले होते. अर्थात त्यामुळे सुचित्रा सेनना फ़रक पडत नव्हता कारण विवाहानंतर केवळ चार वर्षातच दोघे अलग राहात होते. मात्र त्यानंतर त्या एकट्याच राहात होत्या. एकमेव मुलगी ’मुनमुन सेन’ स्वतंत्र आयुष्य जगत होती. त्यामुळेच की काय सुचित्रा सेन यानाही संसाराची विरक्ती आली असावी आणि “आंधी” नंतर त्यानी केवळ दोनच बंगाली चित्रपट केले व शांतपणे चंदेरी दुनियेचा निरोप घेतला व स्वत:ला रामकृष्ण मिशनच्या कार्यात गुंतवून घेतले. सार्वजनिक जीवनात त्या कुणालाच “अभिनेत्री” या नात्याने भेटल्या नाहीत. आजारीपणाच्या काळात त्या एकाकीच होत्या.

सत्यजित रे यानी खास सुचित्रा सेन साठी म्हणून “देवी चौधुराणी” चित्रपटाची घोषणा केली होती. पण हिने त्याना ठाम नकार दिला आणि स्वीकारलेल्या एकाकी जीवनातच तिने सौख्य मानले. बंगाल प्रांतात असाही प्रवाद ऐकायला मिळतो की सन १९८० मध्ये तिचा अत्यंत लाडका अभिनेता तसेच मित्र उत्तम कुमार निधन पावला आणि त्या धक्क्यातून ती सावरू शकली नाही. अन्य अनेक जोड्यांच्या संदर्भात उठतात तशा उत्तम-सुचित्राबद्दलही भरपूर पतंग उडविले गेले होते. त्याना या जोडीने कधीही प्रतिसाद दिले नाहीत…ना होकारार्थी ना नकारार्थी….पण चित्रपटसृष्टीत असले विषय नेहमीच चालत असतात. आज आपल्यातून अखेरचा निरोप घेऊन गेलेली ही अत्यंत गुणी आणि अभिनयसंपन्न अभिनेत्री नेहमी स्मरणात राहील तेही विशेष करून ’पारो’ बद्दलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *