हॉलिवूड सुवर्णकाळ प्रतिनिधी….कर्क डग्लस….नाबाद १०० ! Kirk Douglas

हॉलिवूड सुवर्णकाळ प्रतिनिधी….कर्क डग्लस….नाबाद १०० !

हॉलिवूड सुवर्णकाळ प्रतिनिधी….कर्क डग्लस…. Kirk Douglas

९ डिसेंबर २०१६. बेव्हर्ली हिल्स हॉटेलच्या मुख्य सभागृहात दुपारी एका विशेष आणि आनंदी कार्यक्रमासाठी हॉलिवूड तसेच सामाजिक स्तरावरील अनेक ख्यातनाम लोक जमले होते. बरोबर तीन वाजता सुप्रसिद्ध अभिनेता मायकेल डग्लस आणि त्यांची पत्नी अभिनेत्री कॅथेरीन झेटा-जोन्स, त्यांची दोन मुले यानी कार्यक्रम ज्यांच्यासाठी आयोजित केला होता त्या विशेष व्यक्तीला घेऊन सभागृहात प्रवेश केला आणि उपस्थितांकडून हर्षभराच्या टाळ्यांच्या आणि कौतुकाच्या वर्षात ती व्यक्ती किती भारावून गेली असेल याची कल्पना प्रत्येकाला येऊ शकते. वाढदिवस एरव्ही देखील साजरे होत असतातच पण आजच्या वाढदिवसाला खास झालर होती ती म्हणजे हॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आणि सध्याचे सर्वच दृष्टीन ज्येष्ठ अभिनेते आणि एक कुटुंबवत्सल व्यक्ती….कर्क डग्लस….ज्यानी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली.

कर्क डग्लस यांचे चिरंजीव मायकेल डग्लस (जे स्वतःच आता ७२ वर्षाचे झाले आहेत. कर्कचा नातू ४० वर्षाचा झाला आहे तर पणतू २० च्या पुढील आहेत) यानी वडीलांची महती सांगताना त्यानी आपल्याला अभिनय क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून किती मोलाचे मार्गदर्शन (विशेषतः “वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट” च्या निर्मिती दरम्यान…) केले त्याची थोडक्यात माहिती दिली. शतक महोत्सवी कार्यक्रमास अनेक नामवंत हजर होते त्यातील प्रमुख एक नाव म्हणजे सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक स्टीव्हन स्पिएलबर्ग आठवड्यापूर्वीच एका सेटवर झालेल्या अपघातामुळे स्पिएलबर्ग जखमी झाले होते तरीही कुबड्यांच्या आधार घेऊन ते त्यांच्या आदर्शाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. आपल्या छोट्याशा भाषणात स्पिएलबर्ग यानी कर्कच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा यथोचित गौरव केला. स्पिएलबर्ग यानी खास उल्लेख केला तो एका गोष्टीचा की त्यांच्या चित्रपटात भूमिका केलेल्या सर्व अभिनेत्यांना ते मुद्दाम वेळ काढून कर्क डग्लस यांचे चित्रपट पाहायला सांगत. त्यांच्या दृष्टीने कर्क डग्लस त्या क्षेत्रातील शिक्षणसंस्थाच होय. कर्कच्या पत्नी अॅंना (ज्यांची गेली ६२ वर्षे कर्कला साथ आहे) या प्रसंगी अर्थातच त्यांच्या सोबतीने हजर राहून कार्यक्रमाच्या शोभी द्विगुणित करत होत्या. १०० वर्षे पूर्ण केलेल्या कर्क डग्लस यानी तितक्याच उत्साहाने शुभेच्छांचा स्वीकार तर केलाच पण भाषणातून आणि भेटीतून सर्वांचे कौतुक तर केलेच शिवाय गेल्या कित्येक वर्षाचे त्यांच्या तब्येतीला सांभाळणारे त्यांचे भारतीय मित्र आणि कार्डिऑलॉजिस्ट डॉ.पी.के.शाह यानी सायंकाळी बरोबर पाच वाजता सर्वासमक्ष त्याना व्होडकाचा एक ग्लास अगदी आनंदाने भरून दिला. याच डॉ.शाह यानी कित्येक वर्षापासून कर्कला मद्यपानापासून कटाक्षाने दूर ठेवले होते. गंमतीचा भाग म्हणजे त्यांच्याकडूनच तितक्याच उत्साहाने कर्क डग्लस यानी त्या व्होडकाचा एकच घोट घेऊन आपली पसंती प्रकट केली. कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यास कर्क डग्लस यानी उपस्थितांना विनंती केली आणि तीन तासानंतर त्यानी सर्वांचा अगदी आनंदाने निरोप घेऊन आपल्या ते निद्रेसाठी खोलीत परतले.

या निमित्ताने कर्क डग्लस या अभिनेत्याच्या हॉलिवूड प्रवास आणि कारकिर्दीविषयी दोन शब्द….(विशेषतः ज्यानी कर्क डग्लसचे चित्रपट पाहिले नसतील अशा नवीन पिढीतील वाचकांसाठी).

९ डिसेम्बर १९१६ मध्ये जन्मलेल्या कर्क डग्लस यानी अगदी वयाच्या तिशीत हॉलिवूड चित्रपटसृष्टीत The Strange Love of Martha Ivers या १९४६ च्या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले. १९६० पर्यंत विविध कथानकांच्या चित्रपटातून आघाडीचा नायक या नात्याने त्यांची कारकिर्द बहरली. १९४९ मध्ये आलेल्या “चॅम्पिअन” या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा खूप गाजावाजा तर झालाच शिवाय त्याना उत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर नॉमिनेशनही मिळाले. १९५६ मध्ये आलेल्या आणि अतिशय गाजलेल्या “लस्ट फॉर लाईफ” चित्रपटात व्हिन्सेन्ट व्हॉन गॉग या चित्रकाराची भूमिका साकारली. त्या भूमिकेसाठीही त्याना ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते. बर्ट लॅन्केस्टर या आणखीन त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यासमवेत त्यांची जोडी चांगलीच जमली. दोघांनी वेस्टर्न कथानक चित्रपटांतून जगभर वाहवा मिळविली आणि तितकाच बक्कळ आर्थिक फायदाही निर्मिती संस्थेला मिळवून दिला. १९५५ मध्ये कर्क डग्लस यानी स्वतःची अशी ब्रिना (कर्क डग्लसच्या मातोश्रीचे नाव) मूव्ही प्रॉडक्शन कंपनी सुरू करून त्याद्वारे चित्रपट निर्मितीही सुरू केली. त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे १९६० मध्ये आलेला “स्पार्टाकस”.

नाट्यचळवळीशी ते खूपच निगडीत होते. १९६३ मध्ये केन केसी या लेखकाकडून त्याच्या “वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट” या त्यावेळी अतिशय गाजत असलेल्या कादंबरीचे नाटकासाठी आणि चित्रपटासाठीचे हक्क विकत घेतले. सर्वप्रथम त्यानी स्टेजवर नाटक आणले आणि त्यातील प्रमुख पात्र रॅन्डल मॅकमर्फीची भूमिका अतिशय प्रभावीरित्या साकारली. नाट्यप्रेमींनी नाटक आणि कर्क डग्लसच्या त्या भूमिकेचा यथोचित गौरव केला. नाटक इतके गाजले म्हटल्यावर साहजिकच डग्लस यांच्या मनी त्या कादंबरीवर आधारित चित्रपट निर्मिती निश्चिती केली. प्रमुख भूमिकेत अर्थातच ते चमकणार होते. पण निर्मितीत असंख्य अडचणी शिवाय त्यांचे अन्य चित्रपटातील कामे यांच्या तारखा यांचा मेळ बसेना…आणि या चित्रपटाचा विषय मागे पडू लागला…किंबहुना थांबलाही. त्यातच डग्लसचे वयही वाढत चालले होते व मुख्य पात्र मॅकमर्फीच्या वयाशी ते मेळ खात नसल्याने त्यानी शेवटी आपला मुलगा अभिनेता मायकेल डग्लस याच्याकडे कादंबरीचे हक्क देऊन टाकले व त्यालाच चित्रपट निर्मितीची विनंतीही केली. मायकेल डग्लस (जो स्वतःच ऑस्कर विजेता अभिनेता आहेच) यानी त्या संधीचे अक्षरशः सोने केले आणि मॅकमर्फीच्या भूमिकेसाठी जॅक निकोल्सनला घेतले. त्याने तर ही भूमिका इतकी गाजविली की चित्रपटाला जी प्रमुख पाच ऑस्कर्स मिळाली त्यात जॅकच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबद्दलचे अर्थातच होते. आजही हा चित्रपट हॉलिवूडच्या “ऑल टाईम बेस्ट”च्या यादीत ठिकठिकाणी दिसत असतो. कर्क डग्लस आणि जॅक निकोल्सन दोघांनीही ही भूमिका अनुक्रमे नाटक आणि चित्रपट इथे अमर करून टाकली आहे.

नाट्यसृष्टी, चित्रपट, सामाजिक कार्य, संगीत (झुबिन मेहता यांच्याशी त्यांची खास मैत्री…), निर्मिती, संघटक आदी विविध कामात ते गर्क असत. सतत कामकाजातही त्यानी जाणीवपूर्वक आपल्या तब्येतीकडेही लक्ष दिल्यामुळेच की काय त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत राहिली आहे. मात्र १९९१ मध्ये झालेल्या एका अपघातामुळे त्यांच्या हालचालीवर खूप मर्यादा आल्या. ते जवळपास निवृत्तीचेच जीवन जगू लागले….पण त्यानी कधीही आपले नाते चित्रपटसृष्टीतील घडामोडीपासून अलिप्त ठेवले नाही. या ना त्या निमित्ताने ते विविध कार्यक्रमातून आपला वेळ व्यतीत करीत राहिले आहेत…..शिवाय सोबतीला असलेला प्रसन्न हसरा चेहरा….मला वाटते त्यांच्या शंभरी मागील हा स्वभावच एक मोठे औषध असेल.

Ashok Patil ,Kolhapur.

14 December 2016

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *