१३ जानेवारी १८८८ ते २०१५…. १२७ वर्षाचा झाला हा तपस्वी !

१३ जानेवारी १८८८ ते २०१५…. १२७ वर्षाचा झाला हा तपस्वी !

१३ जानेवारी १८८८ ते २०१५…. १२७ वर्षाचा झाला हा तपस्वी !
“नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन“. जगातील असा एकही देश नसेल की जिथे हे मॅगेझिन पोहोचलेले नाही. १३ जानेवारी १८८८ साली भूगोल विषयासाठी आणि पहिल्या अंकासाठी ज्यावेळी बोर्ड स्थापन झाले त्यावेळेपासून आज १२७ वर्षे झाली मॅगेझिनच्या स्थापनेला आणि केवळ विद्यापीठ महाविद्यालये इथल्याच ग्रंथालयात नव्हे तर अगदी राष्ट्रपतीपासून ते ग्रामीण भागातील एखाद्या संस्थेतदेखील अत्यंत दिमाखाने जागा मिळविलेल्या अंकांमध्ये आपल्या सादरीकरणाने आणि फोटोग्राफ्सनी सजलेले हे मॅगेझिन प्रसिद्धीच्या लाटेवर विराजमान झाल्याचे दिसते. टेलिव्हिजनचा जमाना भारतासाठी अजून शेकडो मैल दूर होता तरी त्या काळी मला ‘नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन’ वाचण्याचे जबरदस्त वेड होते. माझ्या कॉलेजमधील मी कदाचित एकमेव विद्यार्थी असेन की जो ग्रंथपालाना थेट भेटून ‘या महिन्याचा नॅशनल जिऑग्राफिक अंक अला का, सर ?” असे अदबीने त्यांच्यासमोर उभे राहून विचारीत असे. श्री.बोन्द्रे नामक ग्रंथपालाना ते फार भावत असे; कारण खुद्द कॉलेजच्या भूगोल विभागाच्या एकाही प्राध्यापकाने त्यांच्यासमोर त्या मॅगेझिनबद्दल कधी इतकी उत्सुकता दाखविली नव्हती. एकदा का अंक [कॉलेज लायब्ररी सहीशिक्काने बरबटणे झाल्यावर] हाती आला की पुढील सारा दिवस मला अक्षरशः जादूमय वाटत असे. सहा तासात जगाच्या अशा काही भागाची सचित्र सफर माझ्यासाठी घडत असे की तेवढ्या काळात पन्नास पुस्तके वाचून देखील जितकी माहिती मिळाली असती त्यापेक्षाही माझ्याकडे विश्वातील नैसर्गिक घडामोडीचा विदा एकत्रित होत असे. अशा या मॅगेझिनमध्ये मला नोकरी मिळावी असे मला मनापासून वाटत होते. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचे ज्ञान अर्थातच शून्य. पण ती बाब माझ्या मनी घर करून राहिली होती हे निश्चित.

सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ नजरेसमोर आणल्यास जाणवते की ते दिवस विज्ञानातील विविध संशोधनांनी झपाटून टाकले जाण्यासाठीच जणू होते. कामासाठी येजा करण्यासाठी मोटारकार्स नव्हत्या. घोडागाडीच असायची. अमेरिकेत तर थंडीमुळे सायंकाळी बाहेर पडणे….कारण चालत जायचे असल्याने…मुश्किलच वाटायचे. काही ठिकाणी विज्ञानविषयाला वाहिलेल्या चर्चांच्या सुगीचा तो काळ होता. चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा निबंध चांगलाच गाजला होता. “डीसेन्ट ऑफ मॅन” हा त्याचा ग्रंथ जो १८७१ मध्ये प्रसिद्ध झाला होता, तोही चर्चेचा विषय बनला होताच. मार्क्स आणि एंगल्स यानी अर्थशास्त्राविषयी काही समीकरणे मांडली होती तर १८६७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कॅपिटल’ वरील चर्चाही रंगत असे. फ्रॉईडच्या हिस्टेरिया आणि तत्सम मानसिक रोगावरील संशोधनेही याच काळातील.,….तरीही या सर्वावर कडी करणारा चर्चेचा विषय झाला एक शास्त्रज्ञ….त्याचे नाव होते ‘थॉमस अल्वा एडिसन’. एडिसन ज्याने १८७७-७८ मध्ये शोधलेला “इलेक्ट्रिक बल्ब” अमेरिकेत ज्याच्या त्याच्या तोंडी विषय बनला होता. पहिलाच बल्ब जवळपास पन्नास तास जगला आणि मग त्यावर पुन्हा संशोधन होऊन आवश्यक त्या प्रक्रिया केल्यानंतर लख्ख प्रकाशाबरोबर त्याचे आयुष्यही वाढले आणि मग १८७९ च्या नवीन वर्षारंभदिनी विजेच्या प्रकाशांनी वेढलेले न्यू यॉर्क शहरातील काही भाग पाह्यला रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक गोळा झाले होते. याचवेळी दुसरीकडे म्हणजे पॅरिसमध्ये जगप्रसिद्ध असा आयफेल टॉवरही उभा राहिला….ते साल होते १८८९. तत्पूर्वीही हजारो फ्रान्सवासी नेहमीच त्या बांधकामाची उभारणी पाह्यला एकत्र जमत असत.

सारे दशकच अशा विविध संशोधनाच्या चमत्कारांनी भारलेले होते. लोकांना अशा संशोधकांची, त्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या तयारीची, अखंड प्रवासाची, जगभर घडत असलेल्या भौगोलिक घटनांची तसेच अगणित अखंड आणि अटळ अशा भटकंतीची आणि त्यासोबत ते काढत असलेले फोटोग्राफ्स बसल्या घरी पाहाण्याची ओढ लागून राहिली होती. मग संशोधनावर तसेच संशोधकांच्या जिद्दीवर प्रेम करणारे ३३ गृहस्थ वॉशिंग्टन येथील कॉस्मॉस क्लबमध्ये एका बोचर्‍या थंडीत एकत्र आले….त्यांच्यासमोर विषय होता “भूगोल विषयाला वाहिलेले एखादे मॅगेझिन” सुरू करणे. चर्चा सुरू झाली….”मित्रांनो आपण इथे जमलो आहोत एका कारणासाठी आणि ते म्हणजे भूगोल हा विषय वैज्ञानिक नजरेतून सर्वसामान्य जनतेसमोर छापील स्वरूपात आणायचा आणि तसले मॅगेझिन प्रकाशन करण्यासाठी जी काही कार्यवाही करावी लागेल, तिच्या तयारीसाठी. आपली पृथ्वी ही एक विस्मयजनक अस्तित्वाची खूण असून आकाश, तारे, सागर, जंगल, पशूपक्षी, वस्त्या, मानवी जीवन आदीची माहिती सुशिक्षित आणि अशिक्षित या सर्वांना, ज्यासाठी सोबत चित्रेही देणे आहे, दिली पाहिजे. विज्ञानाचा त्याद्वारे प्रसार आणि प्रचार करता येईल…” इ.इ. विचार मांडले गेले…आणि ठरावावर उपस्थितांच्या सह्या झाल्या. १२७ वर्षापूर्वी सायंकाळी क्लबमधील त्याच टेबलवर तो विषय पास केला गेला आणि प्रत्येकाने त्यासाठी यथाशक्ती देणगी दिली. नियमानुसार हजर असलेल्यापैकी भूगोल विषयात तज्ज्ञ मानले गेलेले गार्डिनर ग्रीन ह्यूबर्ड (३३ पैकी हेच एकटे आर्थिक बाजूने सक्षम असे होते) यांची “नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी” च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षानी आपल्या पहिल्याच भाषणात स्पष्ट केले की, “जिऑग्राफी हा विषय कुणा एका विशिष्ट अशा तज्ज्ञाचा नसून ज्याला कुणाला या विषयात स्वारस्य असेल, ज्ञानप्रसाराच्या कामासाठी उत्सुक असेल, ती व्यक्ती सोसायटीचे सदस्यत्व घेऊ शकते.” त्याकाळात सोसायटीकडे संचीत धनाचा तुटवडा असला तरी वर्गणी आणि देणग्याद्वारे काही आवश्यक तितकी रक्कम गोळा करून उद्दिष्टासाठी म्हणून “नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन” चालू करण्याचे ठरले. स्थापनेच्या नवव्या महिन्यानंतर सोसायटीने प्रथम अंक म्हणून एक अंक प्रसिद्ध केला. ज्याच्या प्रथम प्रकाशनापासून अमेरिकेच्या पसंतीला उतरला होता. चित्रांबरोबरीने जगातील विविध देशातील माहिती आणि परंपरा तसेच नकाशेही देण्याच्या पद्धतीमुळे मॅगेझिनला लोकप्रियता लाभत गेली.

साल १९०० जवळ येत गेले आणि पाच खंडात विभागल्या गेलेल्या “पृथ्वी” नामक ग्रहाची सचित्र ओळख अनेक प्रकारच्या जातीजमातीच्या लोकांना या मॅगेझिनद्वारे होत चालली आहे हे पाहताना वाचताना, अनेक कारणासाठी जगाच्या अनेक ज्ञातअज्ञात भूतलावर भटकंती करत राहिलेल्या शास्त्रज्ञ आणि अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीही आपले वैयक्तिक संशोधन अहवाल प्रकाशनासाठी “नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन” ला प्रथम पसंती दिली. ध्रुवाचा शोध घेणार्‍या रॉबर्ट पियरीने चित्तथरारक असे प्रवास अनुभवाचे लेख एकापाठोपाठ एक अशारितीने मॅगेझिनमधून प्रकाशित होऊ लागताच ते अंक विशेष आकर्षण ठरले गेले. जिऑग्राफिक मॅगेझिनमधून संशोधन प्रकाशित होणे म्हणजे अभ्यासाला सादर नमस्काराबरोबरच त्या संशोधनाला होकाराची बळकटीही मिळत गेल्याने लेखक आणि वाचक दोन्ही वर्गाची अशी एक मोहोर मिळत गेली. अमेरिकेच्या राज्यसत्तेनेही मॅगेझिनच्या दर्जाला मान्यता देताना त्यातून प्रकाशित होणार्‍या अनुभवांचा उल्लेख जाहीर कार्यक्रमातून होत गेला (इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे जरूरीचे आहे की नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिनने कधीच पॉलिटिक्स हा विषय आपल्या लेखांत घेतलेला नाही). ह्युबर्ड या संस्थापकांकडून अत्यंत अभ्यासपूर्णरित्या चालू झालेल्या ह्या प्रकल्पाचे संचालकत्व पुढे थोर संशोधक अलेक्झांडर बेल यांच्याकडे आले. विशेष म्हणजे हेलेन केलर ह्या एका आंधळ्या, बहिर्‍या, मुक्या मुलीला शिक्षण देण्याची संधी बेल यानी ह्याच मॅगेझिनद्वारे दिली. बेल यांच्या या वृत्तीचा सार्थ गौरव पुढे हेलेन केलर यानी आपल्या भाषणात केला होता. अलेक्झांडर बेल यांच्या कारकिर्दीत मॅगेझिनला प्रसिद्धी लाभली त्याला कारण म्हणजे खुद्द बेल हे नाव त्यांच्या टेलिफोनशोधामुळे जगभर गाजत होते. अर्थात “नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन” ला खर्‍या अर्थाने प्रसिद्धी आणि पैसा तसेच जगत प्रसार होण्यास कारणीभूत ठरले ते तब्बल पंचावन्न वर्षे संपादकपदी राहिलेल्या गिल्बर्ट ग्रोस्व्हेनर यांच्या विषयातील अग्रेसर तज्ज्ञ आणि कल्पकतेमुळे. इतका दीर्घकाळ संपादन केलेल्या व्यक्तीने मॅगेझिनला केवळ अभ्यासकांपुरतेच नव्हे तर जगभरातील ग्रंथालयामध्ये निव्वळ वाचनानंदासाठी हजेरी लावणार्‍या लाखो सभासंदात “जिऑग्राफी” विषयाचा नादच लावला. मॅगेझिनची अत्युत्कृष्ट म्हटली जाणारी छपाई, दर महिन्याचा जवळपास सव्वाशे पानाचा अंक…तोही सारा आर्टपेपरवर. सर्वात मोठे आकर्षण रंगीत चित्रे. मी स्वत: पाहिलेले शेकडो वाचक असेही होते जे केवळ अंकातील चित्रे पाहाण्यासाठी करवीर नगर वाचन मंदिर ग्रंथालयात ह्या मॅगेझिनची मागणी करत असत. १९८८ या वर्षी शतकपूर्वीच्या निमित्ताने “नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन” ने शंभर वर्षात प्रकाशित झालेल्या सर्व अंकाच्या वीस सीडीज प्रसिद्ध केल्या. त्या जगभरात वितरीत झाल्या. माझे नशीब खरेच चांगले अशासाठी की ह्या सर्व सीडीज आणि त्यातील शंभर वर्षांचे अंक मला कॉम्प्युटरवर पाहाता आले आणि मॅगेझिनमध्ये प्रकाशित झालेले ते सारे अभ्यासपूर्ण लेखही.

विषयांचा तोटा कधीच पडला नाही मॅगेझिन आणि बोर्डाला. अंतराळ, सागर, तारका, ग्रहमालिका, वारावादळपाऊसऊन, जंगल, रस्ते, नद्या, रोगराई, दुष्काळ, शरीरविज्ञान, वातावरणशास्त्र, पशूपक्षी, सरपटणारे प्राणी, महाकाय प्राण्यापासून टीचभर मुंगी….अनेकविध विषय…आणि त्यांच्यासोबतीने अथक श्रम करीत भटकंती करणारे, एका वेडाने पछाडलेले संशोधक आणि त्यांचे सहकारी….या सर्वांच्या लेखणीला आणि छायाचित्रणाला जादूचे पंख देवून मॅगेझिनच्यामाध्यमातून जगात पोचविणारे संपादक मंडळ.

आज १३ जानेवारी २०१५…..आणि जणू काही परवाच झालेली अशी १३ जानेवारी १८८८ ही तारीख…दोन्हीमधील अंतर आहे तब्बल १२७ वर्षाचे….अंक पहिला घ्या वा अंक शंभर वर्षाचा घ्या…सादरीकरणाचा दर्जा तोच. भाषाही अगदी संशोधनाला जवळ करणारी. सव्वाशे वर्षात विज्ञानाने आणि आर्थिक उलाढालीने जग कितीतरी बदललेची साक्ष देणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर येतील….एवढ्या मोठ्या प्रवासात “मॅगेझिन” ही परंपरा आवश्यक असतेच…तरीही काल येतात आणि आज अस्तंगत होतात अशाही कहाण्या आपण अनुभवतोच. अशा स्थितीत एखाद्या मॅगेझिनने आपला दर्जा आणि स्थान जगभरात अशाच मानाने टिकवून ठेवणे ही गोष्ट जितकी आल्हाददायक आनंददायी तितकीच प्रेरणा देणारीसुद्धा.

–  अशोक  पाटील, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *