“अल्थिया…..” ~ आला क्षण मोत्याचा, गेला क्षण मोत्याचा ! …जी.ए.जादू

“अल्थिया…..” ~ आला क्षण मोत्याचा, गेला क्षण मोत्याचा ! …जी.ए.जादू

“अल्थिया”  आला क्षण मोत्याचा, गेला क्षण मोत्याचा :

वर्षानुवर्षे मराठी कथाप्रेमींनी जी.ए.कुलकर्णी यांच्या संदर्भात ज्या चर्चा केल्या, वाचल्या, लिहिल्या त्यात प्रामुख्याने (अर्थात साहजिकच) त्यांच्या अनेक कथांवर त्या बेतलेल्या असणे स्वाभाविक होय. पण आज त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या एका स्त्री-पात्राच्या संदर्भात हा लेख लिहिण्याचे माझ्या मनी आले आहे. सन १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जी.ए.कुलकर्णी यांच्या “रमलखुणा” या कथासंग्रहात दोन दीर्घकथांचा समावेश असून पहिली “प्रवासी” १९७१ च्या सत्यकथा दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती तर दुसरी “इस्किलार” मौज वार्षिक १९७३ मध्ये प्रसिद्ध झाली होती. दोन्हीही जी.ए.कुलकर्णी यांच्या समर्थ आविष्काराच्या साक्षीदार असून मराठी कथासाहित्याच्या परंपरेतील मैलाचा दगड ठरतील अशाच राहिल्या आहेत आणि राहतीलही इतकी त्यांची थोरवी आहे. “इस्किलार” कथेवर वेळोवेळी अनेकांकडून समीक्षात्मक असेल वा लेखकांविषयी मनी असलेल्या आदरापोटी असेल, ठिकठिकाणी लिखाण आले आहे. कथेची मांडणी एखाद्या ग्रीक वा इजिप्शिअन वा अरेबियन मातीत हे सारे घडले असावे अशी धाटणीने केली असून त्यावर जी.ए. यांच्या थक्क करून टाकणा‍र्‍या शब्दसामर्थ्याची विलक्षण अशी छाप आहे. कथेच्या सुरुवातीलाच समुद्रकिनार्‍यावर जाळे घेऊन काम करत असलेला एक धीवर आणि शेजारी आरामासाठी वाळूत पसरलेला कथेचा नायक (ज्याला कथेत कोणतेही नाव दिले गेलेले नाही…) यांच्यातील सहज घडत आलेल्या संवादात “इलिनोआ, अर्शिया, सिथीया, लाओनिया, अर्शिपॉलिस” या राज्यांची नावे येतात म्हणजे ग्रीक/रोमन अशा परंपरीतील साम्राज्याचे हे घटक असू शकतील शिवाय अर्शिपॉलिस साम्राज्याच्या सरहद्दी हिंदपर्यंत पोचल्या होत्या असेही संवादादरम्यान नायक धीवरला सांगतो. थोडक्यात यातील कथानक अशाच ग्रीक पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशातील आहे हे समजून त्या पात्रांसोबत आपल्याला प्रवास करावा लागतो….जो विलक्षण अद्भूत आणि कपाळी माझ्या काय लिहिले आहे याचा अविरत शोध घेणार्‍या एका तरुणाच्या तडफ़डीचा आहे….. बाकी काही नाही तर त्याच्याकडे आहे नियतीने त्यालाच दिलेला एक शाप… “माझा हातून अतिभीषण पाप घडणार आहे म्हणून मला टाकून देण्यात आले एवढेच मला माझ्या नंतरच्या आयुष्यात समजले.” असे तो म्हणत राहतो. याचा नेमका असा सविस्तर अर्थ शोधण्याचा त्याचा यातनामय ठरणारा प्रवास सुरू झालेला आहे. सातव्या महिन्यातील पौर्णिमेदिवशी समुद्रकिनार्‍या जवळ असलेल्या एका टेकडीवर असलेल्या राज्यमंदिरातील सेविका लोकांना भविष्य सांगते असा समज पसरलेला असतो आणि त्यावर विश्वास ठेवून कथानायक तिकडे आलेला आहे. मंदिरात तो येतो आणि तिथे केवळ एक दासी आणि ती सेविका या दोनच व्यक्ती पाहून याला विस्मय होतो. त्याला वाटत होते की भविष्य जाणून घेणार्‍यांची बरीच गर्दी असेल. पण आता त्याच्याकडे जास्त वेळ नसल्याने चटदिशी आपली व्यथा तो दासीला सांगतो. दासी कर्तव्यदक्षतेने त्याचे म्हणणे त्या सेविकेपर्यंत पोचविते. त्यावर ते एकून ती सेविका त्याला देते त्याचे भविष्य म्हणून तीन शब्द “सेरिपी-इस्कहार-एली”. हे शब्द जगातल्या कुठल्या भाषेत असतील वा नसतील. पण त्याला हे मिळाले आहेत बेटावरील एका मंदिरेतील भविष्य सांगणार्‍या सेविकेकडून….त्याचा अर्थ काय ? हे तिने नाही सांगितलेले मात्र आता त्या शब्दांचा अर्थ स्वत:च शोधून काढून “मला एकच आस होती. मी जन्माला येताना केवळ माझ्यासाठीच जन्माला आलेले एकमेव माझे, असे ते भीषण पातक कोणते ? ते जाणून घेण्याची फ़क्त एकच आस…”

जी.ए. कुलकर्णी यांच्या जवळपास सार्‍याच कथा मुख्यत्वेकरून नायकप्रधान असून स्त्री पात्र कथेत येते ते पत्नी, बहीण, सून, सखी, मावशी, शेजारी, नोकरी करणारी, आजारी, वेडी अशा छोट्या म्हटल्या जाणार्‍या भूमिकेत. रुक्मिणी, काशी, कमळी, कावेरी, गौरी, राणी, सावित्री, गुल्शी, भिंगरी, भिवरी, वासंती, राधी, चंद्रावळ या त्यांच्या काही स्त्री पात्रांची नावे जी आपल्याला १९५९ च्या त्यांच्या प्रथम कथासंग्रह “निळासावळा” ते १९७७ मध्ये आलेल्या “पिंगळावेळ” या शेवटच्या कथासंग्रहातील कथामधून भेटतात. अजूनही अनेक आहेत पण प्रामुख्याने ही सर्वसामान्य नावांसह आलेली पात्रे. रुपक किंवा प्रतिमा किंवा दृष्टांत कथाप्रवास जेव्हा त्यानी सुरू केला. उदा. “प्रवासी, विदूषक, रत्न, गुलाम, ठिपका, बळी, काली, रक्तमुखी, यात्रिक….आणि अर्थातच इस्किलार” त्यावेळी त्या अनुषंगाने स्त्री पात्रांची नावेही कथानकाशी मेळ घेणारी ठेवली गेली…..चंचला, ध्रुवशीला…काही ठिकाणी तर केवळ “ती” इतपतच उल्लेख आल्याचे दिसते. याच इस्किलारमधील नायकाची प्रेयसी, तिचा अखेरचा निरोप घेण्यासाठी बागेत बोलावून घेऊन हा मुलूख सोडून जाण्याचा निर्णय सांगतो तेव्हा “ती” संतापली नाही की चिरडून गेल्याप्रमाणे ती हुंदकेही देऊ लागली नाही. ती त्याला एक अंगठी देत आणि इतकेच म्हणते, “ही अंगठी मी तुला आठवणीसाठी देत नाही. असल्या गोष्टीनीच ज्याची आठवण राहू शकते ते आठवण ठेवण्याच्या किमतीचे नसतेच. ही तुझ्याजवळ असली की तू कधीतरी इकडे परत येशील असे मला वाटते इतकेच. मी आता जाते….” मागे एकदाही न पाहता ती निघून गेली. तिने एकदाही, देठ वळवून कमळ इकडे फ़िरावे त्याप्रमाणे हात उंचावून बोटे हलविली नव्हती. अशी “ती”. मंदिरातील ती सेविका (जी मूळची अर्शियाची राजकन्या”एलिथिया” आहे….आता गुलामीत) जिने त्याला थरथरत त्याचे भविष्य सांगितले आहे….जे त्याला अजिबात समजलेले नाही पण
मंदिरातून बाहेर पडल्यावर शोधण्याचा तो प्रयत्न करत आहे त्या गावात इकडेतिकडे भटकत माहिती एकत्र करत रात्रभर फ़िरत आहे…..मग त्यानंतर थोड्याच वेळात तुषारांचा हलकाच शिडकावा व्हावा त्याप्रमाणे बासरीचा मधुर ध्वनी येऊ लागला आणि त्यात मधूनमधून हलवलेल्या घुंगुरघोसांचा आवाज मिसळू लागला. त्यामुळी एखादी युवती पैंजणाचा नाद करीत बासरीचा स्वरच होऊन चालली आहे, असा त्याला भास होत होता. थोड्याच वेळात त्याला झगझगीत सोन्याच्या कोरीव कामाने जडावलेला मेणा दिसू लागला. वाहकांनी खाली चमकती निळी वस्त्रे नेसली असून, डोक्याला रक्तासारख्या लाल रंगाचा कपडा गुंडाळला होता. मेणा त्याच्यासमोर येताच वाहकांना इशारा मिळाला आणि ते त्यांच्यातील प्राणच एकदम शोषला गेल्याप्रमाणे त्याच क्षणी थांबले व शिलाकृतीप्रमाणे ताठ, स्तब्ध झाले. बासर्‍या-घुंगरांचे नाद देखील विरले. मेण्याच्या बाजूचा तलम रेशमी पडदा थोडा बाजूला झाला व आतून कोणीतरी त्याला म्हटले, “अरे, तू इकडे ये.”

इथे जी.ए.कुलकर्णी “इस्किलार” मधील एक प्रमुख पात्र सादर करतात…. “अल्थिया !” तिचे दैवी सौंदर्य वर्णन वाचताना असे वाटते की जणू आपण रोमन आणि इजिप्शिअन साम्राज्याची रुपवती क्लिओपात्रा किंवा ट्रॉयची सुंदरी हेलेन यांच्या संदर्भातील मोहकता वाचत आहोत. जी.ए. यानी अल्थियाच्या जादूमय सौंदर्याचे जे बहारदार वर्णन केले आहे ते वाचताना जाणवते की त्यांच्या समस्त कथांमध्ये असे भारावून टाकणारे वर्णन कोणत्याच स्त्री पात्रासाठी त्यानी केलेले नाही…अल्थिया एकमेव ! म्हणूनच त्यांच्या कथाविश्वातील एक ठळक नाव. हा नायक मेण्याजवळ गेला आहे आणि रेशमी तलम पडदा बाजूला करतो. मेण्याच्या आत दोन कोपर्‍यात मेणबत्त्या स्फ़टिकांच्या सुबक नळ्यांत शांतपणे तेवत होत्या. निळया मखमली गादीवर ती रेशमी धाग्याच्या सहज वळणाने मागील त्याच रंगाच्या लोडाला टेकून रेलली होती. तिचे एक कोपर लालभडक गिरदीवर टेकले होते. ते जेथे रुतले होते तेथे काळ्या लालसर रंगाचा लहान डोह झाला होता व त्यातून तिचा गोरा हात कोवळ्या विषारी कंदाच्या देठाप्रमाणे वर आला होता. कोणत्याही वस्त्रात तिच्या प्रत्यंगांच्या रेषा डौलदारपणे दिसल्यात असत्या, पण आता तिने घातलेल्या झिरझिरत वस्त्रात, हस्तीदंतावर लालसर प्रकाश पडावा त्याप्रमाणे वाटणारी तिची कांतीदेखील स्पष्ट होती. ती किंचित हलली तेव्हा प्रकाशाची रेषा तिच्या पैंजणावरील रत्नांवरून सरकत झटदिशी वर चढली, अंगावरीले रेशमी वस्त्रांवरून पुढे जात मेखलेवरील रत्नांत एकदम उजळली आणि तिच्या वक्ष:स्थलावरील विविधरंगी रत्नहारावर लालसेने किंचित रेंगाळून तिच्या कर्णभूषणांवर स्थिरावली…..आला क्षण, गेला क्षण. पण या स्त्रीच्या सान्निध्यात मात्र आला क्षण मोत्याचा, गेला क्षण मोत्याचा ! ( या ठिकाणी मला तिच्या असीम सौंदर्याबद्दल जी.ए.कुलकर्णी यांची लेखणी किती प्रभावाने कागदावर फ़िरत असेल याचे पूर्ण उल्लेख देण्याचा मोह होतोय, पण मी ते मुद्दाम करत नाही; कारण ज्या वाचकांनी इस्किलार ही कथा वाचलेली नाही त्यानी निदान या अल्थियासाठी का होईना ही कथा प्रत्यक्ष “रमलखुणा” हाती घेऊन तो सौंदर्यवाचन आनंद घ्यावा…).

या स्त्रीमुळे दगडी पुतळ्यालादेखील अभिलाषा वाटेल. शब्दांत विणलेले स्त्रीचे सौंदर्य बहुधा ती स्त्री प्रत्यक्ष पाहिल्यावर टिकत नाही. पण येथे मात्र निराळीच निराशा आहे. या सौंदर्यापुढे नेहमीचे शब्द मळक्या किड्यांप्रमाणे वाटतात. जर शब्द विजेचे असतील आणि जर त्यांना आपल्या वासाने सारी रात्रच वासकसज्ज करणार्‍या रातराणीचा मदिर गंध असेल, तरच त्यांना हे शरीर सजवता येईल. इस्किलार नायकाचा सारा देह लालसेने भरला. राहिली ती वासना. भूतभविष्याची जाणीव नसलेली, केवल शारीर, झगझगीत नग्न वासना. वासनेच्या सेरिपीचे डोळे दिपवणारे उत्सुक पाते.

देखण्या अल्थियाला अनुभवाने समस्त पुरुषजातीचे हे अतिपरिचित भाव माहीत असल्यामुळे ती फ़क्त हसते आणि नितळ पापण्यांच्या उघडझापेखाली तिच्या डोळ्यांत हा आता आपला झाला या जाणीवेने त्याला जणू हक्काने, बेदरकारपणे एक काम सांगते, “माझे एक काम कर. हे पत्र वर मंदिरात पोचवायचे आहे. ते तू घेऊन जा.” ~ इथून एक वेगळे कथानक सुरू होते…जे कथानायकाचे नसून एका राजकन्येचे आहे….जी आता गुलामीत वर मंदिरात राहून सेविकेचे काम करीत आहे….जिथे हे घडत आहे त्याच्या सम्राटाने अर्शिया या राज्याचा युद्धात पराभव करून राजाला पळवून लावले आहे तर राजकन्येला कैदी करून आपल्या राज्याच्या मंदिरात आणून ठेवले आहे. अर्शियातील अनेक तरुणींना स्वतंत्ररीत्या कैदी म्हणून राज्यात आणले गेले आहे. त्यातील ही एक रुपवती अल्थिया. ती अर्शियाच्या राजकन्येची मैत्रीण पण आता युद्धातील पराजितापैकी एक असल्यामुळे विजेत्याची कैदी आणि गुलामही. विजयोत्सव चालू असताना यांची सार्वत्रिक हेटाळणी चालू होती आणि इकडूनतिकडे फ़रफ़टत जात होत्या. अजूनही अल्थियाच्या मनातून त्या प्रसंगाची शरम तिच्या अंगातून जात नाही असे ती म्हणते….. हे आणि अनेक गोष्टी विस्ताराने तिने त्या पत्रात लिहिल्या आहेत. नायक वाचून दाखवित आहे आणि त्या वाचनातूनच त्याला हेही विस्मयकारक समजते की आपल्या समोर असलेली ही सेविका मंदिरात कैदी म्हणून आहे, इतकेच नव्हे तर अर्शियाची राजकुमारी आहे. वास्तविक अल्थियाचे हे पत्र म्हणजेच जवळपास सहा पानी असून त्याला एका स्वतंत्र कथेचा बाज आहे. वाचताना तो युद्धाचा आणि पराभवाचा तसेच त्यानंतरच्या हलाखीचा आलेख दाखवितोच शिवाय नंतर ईश्वरी देणगी लाभलेल्या त्याच सौंदर्याचा आणि शरीराचा बेपर्वाईने मुक्त वापर करून अल्थियाने सम्राटाकडून राजकन्येच्या मुक्तीचे वचन मिळविलेले असते. उद्यापासून….एक गलबत येईल आणि ते एलिथिया (राजकुमारी) ला जिथे जायचे असेल तिथे घेऊन जाईल.

पुढे ? सारे काही त्याप्रमाणे होते का ? सेरिपी इस्कहार एली चा अर्थ नायकाला उलगडतो का ? एलिथिया आणि अल्थिया यांचे काय होते शिवाय नायकाच्या भाळी असलेले भविष्य कितपत सत्य होते….? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे “इस्किलार” या दीर्घकथेत मिळतील. हा लेख केवळ अल्थियासाठी असल्यामुळे पूर्ण कथेचे परीक्षण इथे केलेले नसले तरीही ही कथा अत्यंत आवश्यक वाचन ही बाब मनी ठेवून वाचकांनी वाचावी…. ज्यानी वाचली आहे तेही या म्हणण्याला पाठिंबा देतील.

Ashok Patil
Kolhapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *