Gulzar गुलझार

Gulzar गुलझार

Gulzar गुलझार:

“…खिड़की पिछवाड़े को खुलती तो नज़र आता था
वो अमलताश का इक पेड़, ज़रा दूर, अकेला-सा खड़ा था
शाखें पंखों की तरह खोले हुए
एक परिन्दे की तरह….”

झेलम जिल्ह्यातील दीना नामक एका छोट्याशा गावात (जे आता पाकिस्तानात गेले आहे) 18 ऑगस्ट 1934 रोजी माखन सिंग कालरा आणि सुजानकौर या दांपत्याच्या घरी जन्माला आलेला संपूर्णसिंग कालरा याला लहानपणापासूनच साहित्याची जवळीक निर्माण करावीशी वाटली होती. हिंदी, ऊर्दू, पंजाबी या तिन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व त्याचबरोबर ब्रज भाषा, हरियाणवी अशा प्रांतिक बोलीशी जवळीक या सार्‍यांचा प्रभाव गुलझार यांच्या लेखनशैलीवर होताच. मात्र वडिलांच्या दृष्टीने लेखन करणे याला फारशी किंमत नव्हती. वडिलांचा रोष नको म्हणून संपूर्णसिंगने आपले सारे लिखाण “गुलझार” या टोपणनावाने लिहिणे सुरू केले आणि त्यालाच अशी काही प्रसिद्धी मिळाली की अजूनही कित्येक चाहत्यांना गुलझार यांचे सत्य नाव माहीत नसेल. बिमल राय आणि कवी शैलेन्द्र यांच्याकडे गुलझार यांच्या प्रकाशित कविता पोचल्या होत्या. त्या दोघांनी या युवकाला “बंदिनी” तील एक गाणे लिहिण्याची विनंती केली. चित्रपटातील बाकीची सारी गाणी शैलेन्द्र यांची पण पडद्यावर नूतनच्या तोंडी असलेले व लता मंगेशकर यानी म्हटलेले “मोरा गोरा अंग ले रे” हे गाणे आजही तितकेच श्रवणीय आहे जितके चित्रपट प्रसिद्धीच्या वेळी.

गुलझार….हे आता कुणा एका व्यक्तीचे टोपणनाव नसून ज्या ज्यावेळी आपण मनोरंजन क्षेत्रापलीकडेही जाऊन एखाद्या कलाकाराच्या जीवन मिळकतीचा अभ्यास करू लागतो त्यावेळी समजून येते की केवळ सफलताच नव्हे तर त्या शिखरावर जाण्यासाठी प्रत्येक लेखकाची कलाकाराची मनोकामना असते पण गुलझार यानी आपल्या गीतांनी आणि अन्य लेखन कार्याने जे यश मिळविले त्यामुळे त्याना तिथपर्यंत रसिकांनीच नेले आहे. भारत सरकारकडून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी तनमन अर्पण करून अहोरात्र सेवा दिली आहे अशा ज्येष्ठांना “लाईफटाईम अचिव्हमेन्ट” ची पोच म्हणून “दादासाहेब फाळके पुरस्कारा”ने गौरविले जाते. यंदाचा (२०१३) हा पुरस्कार गुलझार याना जाहीर झाला आहे आणि विशेष म्हणजे निवड समितीच्या सातही सदस्यांनी या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले आहे.

Image result for Gulzar

ज्या बिमल राय यांच्यासारख्या महान दिग्दर्शकापासून गुलझार यानी चित्रपट कारकिर्द सुरू केली त्यांच्याच हाताखाली त्यानी चित्रपट दिग्दर्शनाचे धडेही गिरविले. कोमल, अर्थपूर्ण गीतरचना हे त्यांचे वैशिष्ट्य तर राहुलदेव बर्मनसोबत त्यानी गाण्यासाठी केलेले गद्यप्रयोग (“इजाजत”) एक चमत्कार मानले जातात. चित्रपटांसाठी गीताबरोबरीने त्याने कथा पटकथा संवादही लिहिले (आशीर्वाद, आनंद, खामोशी). याचा अनुभव त्याना झाला जेव्हा ते स्वतःच दिग्दर्शन क्षेत्रात उतरले. संवेदनशील, मार्मिक आणि हृदयस्पर्शी चित्रपटांची त्यानी मालिका तयार केल्याची उदाहरणे आहेत. १९७१ मध्ये त्यानी मीनाकुमारीला मुख्य भूमिका देऊन “मेरे अपने” हा सुशिक्षित बेरोजगारीवरील स्थितीवर पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. तो गाजल्यावर त्यांचे नाव चित्रपट निर्मितीच्या सर्वच घटकांशी जोडले गेले. “साऊंड ऑफ म्युझिक” कथेवर आधारित त्यानी “परिचय” निर्माण केला तर लागलीच मुके आणि बहिरे जोडपे यांच्या जीवनकथेवर “कोशिश” हा चित्रपट. १९७३ मध्ये विनोद खन्नाच्या भूमिकेने सजलेला “अचानक” आला तर नंतर सर्वार्थाने गाजलेला सुचित्रा सेन अभिनेता “आंधी” व त्यानंतर संजीवकुमार शर्मिला टागोर जोडीचा “मौसम”. व्यक्तीशः मला मौसम बर्‍याच कारणांनी आवडलेला चित्रपट. पैकी संजीवकुमार आणि मदन मोहन यांचे संगीत ही दोन प्रमुख कारणे. या चित्रपटांशिवाय “किनारा…अंगूर….लिबास…हुतूतू…इजाजत….मीरा” असे अनेक चित्रपट गुलझार यांच्या दिग्दर्शन संवादांनी समोर आले…गाजले. संजीवकुमार, विनोद खन्ना, जीतेन्द्र, शर्मिला टागोर, हेमा मालिनी अशा त्या त्या साली प्रथम क्रमांकावर असलेल्या कलाकारांनी गुलझार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास नेहमीच उत्सुकता दाखविली आणि गुलझार यानी सार्‍यांच्याकडून अगदी उत्कृष्ट अभिनयाचे मेजवानी रसिकांना दिली आहे.

गाण्यांच्याबाबतीत तर गुलझार यांच्या चित्रपटांची केवळ यादी जरी दिली तर तो एक स्वतंत्र लेख तयार होईल. त्याबाबत इतकेच लिहिणे योग्य ठरेल की फिल्मफेअरचे उत्कृष्ट गीतलेखनाची तब्बल अकरा पारितोषिके त्यानी मिळविली आहेत…हे एक रेकॉर्डच बनून गेले आहे. देशभरातून त्यांच्यावर अनेक प्रकारच्या पारितोषिकांचा वर्षाव झाला आहे असे म्हटले तरी चालेल….आणि आज दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार.

(हा लेख म्हणजे गुलझार यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा वा साहित्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न नसून दादासाहेब फाळके पुरस्काराने त्याना गौरविण्यात आल्यामुळे प्रासंगिक म्हणून त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिले आहे. साहजिकच त्यांच्या सार्‍याच चित्रपटांविषयी तसेच त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी इथे काही उल्लेख केलेले नाहीत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *