लिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio

लिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio

लिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio :
लिओनार्डो डीकॅप्रिओ….जर्मन आई आणि इटालियन वडील…दोघेही अमेरिकन नागरीक, यांचा मुलगा. अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून अतिशय देखण्या आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनून राहिला आहे जगभर. १९७४ मध्ये जन्मलेल्या या मुलाने बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती आणि अमेरिकन टीव्हीमधून जाहिरातीद्वारा तो सतत चमकत राहिला छोट्या पडद्यावर. याचा अनुभव आणि फायदा त्याला पूर्णवेळ चित्रपट उद्योगात प्रवेश मिळवून देण्यास झाला. वयाच्या १८ व्या वर्षीच त्याने रॉबर्ट डी नीरो समवेत १९९३ मध्ये आलेल्या ‘धिस बॉयज् लाईफ” मध्ये एका युवकाची भूमिका वठविली आणि त्यापुढील इटिंग ग्रेप व बास्केटबॉल डायरीजमधून सहजसुंदर अभिनयामुळे आणि विलक्षण देखणेपणामुळे सर्वसामान्य प्रेक्षक लोक तसेच निर्माते दिग्दर्शकांच्या नजरेत भरू लागला. त्यातील एक बडे नाव होते…जेम्स कॅमेरून. या धडाडीच्या आणि कल्पक दिग्दर्शकाने त्याला हॉलिवूड सृष्टीतील सर्वाधिक गल्ला मिळविलेल्या “टायटॅनिक” चित्रपटातील जॅक डॉसन या प्रमुख भूमिकेसाठी निवडले आणि या चित्रपटाने सर्व जगात जे काही अभूतपूर्व यश मिळविले त्या लोकप्रियतेचा फायदा दोन्ही कलाकारांना….लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि नायिका केट विन्स्लेट याना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप असा मिळाला. त्याचा फायदा दोघांनीही घेतला. “मॅन इन द आयर्न मास्क…. कॅच मी इफ यू कॅन…गॅन्ग्ज ऑफ न्यू यॉर्क….” आदी चित्रपटातील लिओनार्डोच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी त्याला आघाडीचा अभिनेता तर बनविलेच शिवाय मार्टिन स्कोरसेसे, स्टीव्हन स्पिएलबर्ग आदी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या गळ्यातील तो ताईतच बनला. “ब्लड डायमंड” सारख्या राजकीय पार्श्वभूमी आणि काळेगोरे भेदावर असलेला चित्रपट असो, संघटीत आणि मेट्रो शहरातील गुन्हेगारीवर आधारीत “डीपार्टेड” सारखा दिग्गजांच्या भूमिका असलेलाच चित्रपट असो किंवा गल्फ देशातील हेरगिरीबाबतचा “बॉडी ऑफ लाईज” असो….सार्‍या चित्रपटांचा नायक असलेला लिओनार्डो दिग्दर्शकांचाही लाडका बनत चालला. प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत गेल्यामुळे स्टुडिओ सिस्टिमदेखील या नावावर फिदा झाली असल्यास त्यात नवल नाही. प्रचंड बजेटसचे प्लॅन्स बनत गेले आणि त्यांचा केन्द्रबिंदू ठरला हा प्रत्येक भूमिकेतील राजा…लिओनार्डो डीकॅप्रियो…२०१० चा इन्सेप्शन घ्या किंवा हॉवर्ड ह्यूजेसची कहाणी असलेला एव्हिएटर घ्या…तसेच जे.एडगर…प्रत्येक भूमिका स्वीकारण्यापूवी त्या पात्राचा इतिहास तपासून त्यानुसार केवळ अभिनयच नव्हे तर आपले लूक्स आणि देहयष्टीही तशीच असण्यामागे त्याने घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगेच आहेत.

अशा गुणी अभिनेत्याला हॉलीवूड चित्रपटसृष्टीतील मानाचे पान ठरलेले “ऑस्कर” पारितोषिक मिळावे ही त्याच्या जगभरातील चाहत्यांची इच्छा होती….आणि तशी असण्याचे कारण त्याने साकार केलेल्या लक्षणीय भूमिका. ऑस्करसाठी त्याला सर्वप्रथम मानांकन मिळाले ते १९९३ साली सर्वोत्कृष्ट सहा.नायकाचे “गिल्बर्ट ग्रेप” च्या भूमिकेसाठी…नंतर पुढील काळात तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे मानांकन मिळाली….२००५ एव्हिएटर, २००७ ब्लड डायमंड आणि २०१४ वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट….या सर्व वेळी ऑस्करने त्याला हुलकावणी दिली. या व्यतिरिक्त आम्हा लिओ प्रेमी रसिकांना डीपार्टेड आणि रीव्होल्युशनरी रोड तसेच इन्सेप्शन साठीही त्याला मानांकन मिळायला हवे होते असे वाटत राहिले.

पण अखेर २०१५ साल उजाडले आणि त्याला मिळाली एक जबरदस्त भूमिका….”द रेव्हेनंट” या चित्रपटातील नायकाची. चित्रपटात त्याचे दर्शन म्हणजे बर्फाळ प्रदेशातील….सन १८२३ सालातील घडामोडी….त्याने साकारलेली एका सैन्य तुकडीच्या मार्गदर्शकाची भूमिका…तो ही कशी जगला आणि कशारितीने ती पूर्ण क्षमतेनिशी दर्शविली आहे ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहाणे गरजेचे आहे. या चित्रपटातील याच भूमिकेसाठी त्याला जगभरातून अनेक पारितोषिके मिळाली आहेत…पण त्याची आणि त्याच्या चाहत्यांची भूक होती ती ऑस्करची. ते त्याला मिळायला हवेच हवे अशी हवाच तयार झाली.

अखेरीस अ‍ॅकॅडेमीने ते स्वप्न पूर्ण केले आणि यंदाच्या “ऑस्कर” बहुमानासाठी लिओनार्डो डी कॅप्रिओ याची “रेव्हेनंट” मधील ह्यू ग्लास या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड  झाली

अभिनंदन !!

Ashok Patil ,Kolhapur

February 29, 2016.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *