१०१ वर्षाची उत्साही अभिनेत्री….ऑलिव्हिया !

ऑलिव्हिया! Olivia de havilland

१०१ वर्षाची उत्साही अभिनेत्री….ऑलिव्हिया!Olivia de havilland.

इंग्लिश असो वा हिंदी, मराठी…जर आपल्याला एखाद्या आवडत्या अभिनेत्या वा अभिनेत्रीविषयी चार शब्द बोलायला वा लिहायला सांगितले तर आपण आनंदाने लिहू शकू. असे दिसून येते की असे कलाकार सध्याच्या चित्रपटसृष्टीत कार्यरत असण्याची शक्यता असते अथवा निवृत्त होऊन काहीच वर्षे झाली असतील. पण मी जर असे म्हटले की मी आज वयाची एकशे एक वर्ष पूर्ण केलेली आणि उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे दोन ऑस्कर्स पुरस्कार मिळविणारी एक अभिनेत्री आजही तितक्याच उत्साहाने चित्रपट आणि सामाजिक कार्याबद्दल आस्था दाखवित अत्यंत मानाने पॅरिस नगरीत सुखी जीवन व्यतीत करीत आहे इतकेच नव्हे तर अगदी परवाच म्हणज गेल्या महिन्यात (१०१ वर्ष लागायला अजूनी दोन आठवडे बाकी असताना) ब्रिटनच्या राणीने तिची “डेम कमांडर ऑफ़ द ऑर्डर ऑफ़ द ब्रिटिश एम्पायर” या पदावर सन्मानपूर्वक नियुक्ती केली आणि वाढदिवसाची एक आगळी अशी भेट दिली. ब्रिटनच्या राजघराण्यातील सन्मान इतिहासात प्रथमच एका शंभरी पार केलेल्या व्यक्तीचा असा सन्मान केल्याची नोंद झाली…जिचा स्वीकार या जगन्मान्य अभिनेत्रीने अत्यंत विनयपूर्वक शब्दात केला….त्या म्हणाल्या, “The most gratifying of birthday presents“.

आज १ जुलै २०१७….आणि १ जुलै १९१६ रोजी जन्मलेली ही अभिनेत्री “ऑलिव्हिया डी हॅव्हिलॅन्ड”.  “द हेअरेस” आणि “टू इच हिज ओन” या दोन चित्रपटाबद्दल ऑलिव्हियाला उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे “ऑस्कर्स” प्राप्त झाले असले तरीही जगभरातील सिने रसिकांसाठी तिचे नाव कायमचे लक्षात राहिले आहे ते तिच्या “गॉन वुईथ द विंड” या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रीच्या कामासाठी….मेलेनी हॅमिल्टन हे पात्र तिने साकारले होते. या भूमिकेसाठीही तिला सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. १ जुलै १९१६ रोजी टोकियो इथे जन्माला आलेल्या ऑलिव्हियाचे वडील तिथल्या इम्पेरिअल युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिशचे प्रोफ़ेसर होते तर आई लिलियन यानी लंडनच्या रॉयल अकादमी ऑफ़ ड्रॅमॅटिक आर्ट इथून पदवी घेतली होती. या दांपत्याला आणखीन एक कन्या होती…तिचे नाव जोन…(जी पुढे जोन फ़ॉन्टेन या नावाने अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली. हिचकॉकच्या “रिबेका” ची नायिका म्हणून खूप गाजली. जोन फ़ॉन्टेनला देखील अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले होते. ऑस्करच्या इतिहासात दोन भगिनींनी ऑस्कर जिंकण्याचे हे एकमेव आणि लखलखीत म्हणावे असे उदाहरण आहे.)

लिलियन मुळातच नाट्यसृष्टीशी निगडित असल्याने तिने ऑलिव्हियाला अगदी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच नाट्यशिक्षणाचे विशेषत: शेक्सपिअर संवादांची सवय लावली. पुढे आजारपणावर उपचार करण्यासाठी ऑलिव्हियाला घेऊन लिलियन कॅलिफ़ोर्नियाला आली आणि तिथेच मग त्यांचे वास्तव्य झाले. नाट्यशिक्षण, संगीत, काव्य, चित्रकला आणि वादविवाद या प्रांतात ऑलिव्हिया पारंगत होत गेली. एका अष्टपैलू अभिनेत्रीमध्ये ऑलिव्हियाचे रुप पालटत गेले. देखणी तर ती विलक्षण अशीच होती. सौम्य चेहरा आणि नेहमी प्रसन्नच दिसणारी ही युवती हॉलिवूड निर्माते आणि स्टुडिओ संचालक यांच्या नजरेला न पडती तर ते नवलच ! अमेरिकन मनोरंजन क्षेत्राला मोह पाडणारी एक कलाकृती म्हणजे “ऍलिस इन वंडरलॅण्ड”. यात ऑलिव्हियाने काम मिळविले. त्यानंतर मर्चन्ट ऑफ़ व्हेनिस आणि जेन ऑस्टिनच्या गाजलेल्या “प्राईड ऍन्ड प्रीज्युडिस” मध्येही लक्षणीय काम केल्यावर तिचे नाव चहुकडे होऊ लागले. या दरम्यान तिने पदवीही घेतली आणि मिल्स कॉलेज इथे इंग्लिश विषयाची शिक्षिका म्हणून काम करण्याचेही तिने निश्चित केले होते. पण त्याचवेळी तिच्या वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओने तिला “मिडसमर नाईट्स ड्रीम” या चित्रपटासाठी निवडले, तो तिचा खर्‍या अर्थाने पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या दरम्यान ऑलिव्हियाने प्रकाशयोजना आणि संपादनाच्या कित्येक गोष्टी माहीत करून घेतल्या…विद्यार्थीच राहिली ती नेहमी. शेक्सपिअरच्या संवादांची धाटणी तिला तिच्या वयाच्या सहाव्या वर्षापासूनच माहीत असल्यामुळे या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तिच्या संवादशैलीबाबत टीकाकार, समीक्षक आणि सर्वसामान्य प्रेक्षक यांच्याकडून भरपूर प्रशंसा झाली. ऑलिव्हिया डी हॅव्हिलॅण्डला आता मान्यता मिळणार हे निश्चित झाले. त्यानंतर तिच्या जीवनात आला तो हॉलिवूडचा त्या काळातील स्वॅशबकलर रोमॅन्टिक हीरो एरॉल फ़्लिन. त्याच्यासमवेत तिने प्रथम “कॅप्टन ब्लड” चित्रपट केला तो बॉक्स ऑफ़िसवर चांगलाच गाजल्यावर या जोडीचे पुढे तब्बल आठ चित्रपट आले. खूप गाजली दोघांची जोडी. त्यापैकी १९३६ मधील “चार्ज ऑफ़ द लाईट ब्रिगेड” ने तर विक्रमी यश मिळविले.

१९३६ ते १९३९ या काळात स्टुडिओच्या कराराप्रमाणे ऑलिव्हिया समोर येईल त्या चित्रपटात मन लावून काम करत राहिली आणि तिचे नाव चंद्रकलेनुसार वरच्या श्रेणीने गाजत होते. त्या दरम्यान हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते डेव्हिड सेल्झनिक यानी मार्गारेट मिशेलच्या “गॉन वुईथ द विंड” या जगात गाजत असलेल्या कादंबरीवरील चित्रपटाचे हक्क मिळविले होते आणि प्रमुख पात्रांच्या निवडीचे काम चालू होते. एका मित्राला लिहिलेल्या पत्रात सेल्झनिक लिहितात (१९३८ ची गोष्ट आहे), “माझ्या मनात असलेल्या मेलनीच्या भूमिकेसाठी मला जर ऑलिव्हिया डी हॅव्हिलॅण्ड मिळाली तर त्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे…” ~ इतका प्रभाव ऑलिव्हियाने निर्मात्यावर प्राप्त केला होता. त्या काळातील स्टुडिओ आणि कलाकार यांच्यातील वर्षानुवर्षाच्या करार पद्धतीमुळे कित्येकांना फ़्री लान्सिंग करता येत नसे. सेल्झनिकची ती व्यथा होती. मात्र खुद्द कादंबरी वाचल्यानंतर ऑलिव्हियालादेखील स्कार्लेटपेक्षा मेलनीच्या पात्राने जास्त आकर्षित केले होते आणि तिचीही करारातून काही काळापुरती सुटका होऊन या रोलसाठी आपली निवड व्हावी असेच वाटत होते….आणि मध्ये बर्‍याच घडामोडी घडल्या…त्या कायद्याच्या कलमाबाबत असल्याने त्याचा उहापोह मी इथे न करता इतकेच म्हणतो की शेवटी सेल्झनिक यानी ते काम केले आणि मेेलेनी हॅमिल्टन या सुंदर भूमिकेसाठी तितक्याच सुंदर ऑलिव्हिया डी हॅव्हिलॅण्डची सुयोग्य निवड झाली….बाकी चित्रपटाने पुढे जो अनेक कारणासाठी एक आगळा इतिहास घडविला त्याची माहिती जवळपास इथल्या सर्वच सदस्यांना आहेच.

पुढे ऑलिव्हियाने जरी १९६५ पर्यंत सिनेमातून कामे केली असली तरीदेखील तिचे नाव जणू कायमपणे “गॉन वुईथ द विंड” याच चित्रपटासोबत जोडले गेले आहे. आज ती फ़्रान्समध्ये एक अत्यंत कृतार्थपूर्ण असे जीवन जगते आहे.

१०१ वर्षाची उत्साही अभिनेत्री....ऑलिव्हिया! Olivia de havilland

Ashok Patil, Kolhapur.

1 July 2017.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *