कवी पर्सी शेली…. राजकुमारी ऍना…. जलपरी एरीथुसा Percy Shelley – Princess Ann – Arethusa, Roman Holiday

कवी पर्सी शेली…. राजकुमारी ऍना…. जलपरी एरीथुसा

Percy Shelley – Princess Ann – Arethusa, Roman Holiday

Percy Shelley – Princess Ann – Arethusa, Roman Holiday : १९५३ मध्ये आलेला आणि जो जगभर गाजला व आजही हॉलिवूडच्या इतिहासात सर्वोत्तम १०० चित्रपटामध्ये ज्याची गणना न चुकता केली जाते त्या “रोमन हॉलिडे” वर भारतामधील रसिकांनाही तितकेच प्रेम केले आहे. कथानकात एके ठिकाणी राजकुमारी ऍन झोपेच्या इंजेक्शनच्या अंमलाखाली असून ती राजवाड्यातून देखरेख करणार्‍यांच्या नजरा चुकवून रात्री बाहेर पडली आहे व वाटेत तिची रोम शहरातील अमेरिकन प्रेस रीपोर्टर जोसेफ़ ब्रॅडले याच्याशी भेट होते. त्याला वाटते या पोरगीने काही नशापाणी केले आहे आणि अन्य काही उपाय सापडत नाही म्हणून तो तिला रोममधील आपल्या खोलीवर आणतो. त्याला बिलकुल कल्पना नाही की ही झोले घेत असलेली मुलगी प्रत्यक्षात रोमच्या भेटीवर आलेली युरोपातील एका देशाची राजकन्या आहे. दोघांत संवाद होत असताना ही नेहमी महालात राहाणारी आता एका युवकाच्या सामान्य खोलीत कपडे बदलता बदलता एका कविता गुणगुणतेे आणि जोसेफ़ला म्हणते, “मला कीट्सची ही कविता खूप आवडते”. जोसेफ़ तिला शांतपणे म्हणतो, “ही कविता शेलीची आहे…”. यावर ती हट्टाने “कीट्स कीटस…” म्हणत राहते. जो प्रतिवाद घालत नाही आणि रुमच्या बाहेर पडतो. दोघांत एकमत झाले नसले तर ती “एरीथुसा” शीर्षकाची कविता माझ्या मनी राहिली जी एका जलपरीच्या आयुष्यावर इंग्लिश भाषेतील एक महान कवी पर्सी बिशी शेली या श्रेष्ठ अशा कवीने लिहिली होती. सन १८२० मध्ये, म्हणजे आणखीन दीड दोन वर्षांनी तब्बल २०० वर्षे पूर्ण होतील या कवितेला जी पाच कडव्यात आहे आणि जलपरी एरीथुसाची कहाणी सांगते.

Percy Shelley - Princess Ann - Arethusa, Roman Holiday

या निमित्ताने पर्सी शेलीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ या. इ.स. १७९२ मध्ये इंग्लंडच्या ससेक्स प्रांतात असलेल्या हसेम फ़ील्ड प्लेस इथे जन्मलेल्या पर्सी शेली याने शालेय जीवनात एक कुशल विद्यार्थी म्हणून लौकिक प्राप्त केला होता. ईटन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफ़र्ड इथे त्याने शिक्षण घेतले. कॉलेज जीवनात त्याने एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती….”The Necessity of Atheism” त्यात व्यक्त झालेले विचार आणि समाजाबाबतची शेलीची मते ऑक्सफ़र्डच्या संचालक मंडळाला पसंत पडली नाही व त्याबद्दल त्याच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई म्हणून पर्सी शेलीचा नियमित विद्यार्थी म्हणून असलेला प्रवेश रद्द करण्यात आला. पण त्याचा अभ्यास थांबला नाही. त्या काळातील आणि ससेक्स भागातील प्रसिद्ध तत्वचिंतक गॉडविन यांचा तो नियमित विद्यार्थी बनला आणि त्याद्वारे स्वातंत्र्य तसेच एकतेचा पुरस्कर्ता बनला. काव्य लिखाणामध्ये त्याला खूप गती होती शिवाय ग्रीक आणि लॅटिन भाषांही त्याने शिकून घेतल्या होत्या. लॉर्ड बायरन, थॉमस पिकॉक आणि लेह हंट यांच्या मैत्रीसोबत त्याने तारुण्याच्या त्या जीवनात रोमॅन्टिक काळाचा कवी म्हणून नाव मिळविले होते. विवाहानंतर त्याने इंग्लंड सोडून इटली इथे आपले कायमचे वास्तव्य केले आणि व्हेनिस, नेपल्स, रोम अशा विविध ठिकाणी वाचन आणि लेखन करत साहित्य निर्मिती करत राहिला व शेवटी पिसा या गावाला कायमचे निवास केले. सर्व काही आनंदात आणि साहित्य निर्मितीमध्ये चालले असताना ८ जुलै १८२२ या दिवशी पर्सी शेली स्पेज़्ज़िया या बेटावर बोटीने जात असताना अचानक आलेल्या वादळाने या बोटीला जबरदस्त तडाखा दिला आणि त्यात इतर अनेक प्रवाशांसोबत पर्सी शेलीचाही समुद्रात बुडून मृत्यू झाला….त्यावेळी तो अवघा २९ वर्षाचा होता. प्रेम, स्वातंत्र्य, निसर्ग, समाज या घटकांना त्याने आपल्या कवितांमधून प्रामुख्याने स्थान दिल्याचे दिसत्ये. त्याच्या अनेक प्रसिद्ध कवितांमध्ये Ozamandias, Rosalind and Helen, To A Skylark, Alastor, Revolt of Islam, Masque of Anarchy, Prometheus Unbound, Adonais, Hellas, Ode to The West Wind या कवितांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. इटली येथील मुक्कामात इ.स. १८२० मध्ये त्याने जी एरीथुसा कविता लिहिली; त्यातील ग्रीक परंपरा आणि संस्कृतीमधील नायिकेविषयी थोडेसे (ग्रीक महाकाव्यातून अशा कथा बर्‍याच दीर्घ स्वरुपांच्या आणि अनेक घटना तसेच पात्रांची रेलचेल असते. त्या सर्वांचा उल्लेख अशा एका लेखात सविस्तर प्रमाणात करणे शक्य नसते. त्याची मालिका बनवावी लागते) शेलीची जलपरीची ही कविता जास्त समजावी या उद्द्येशाने….

Percy Shelley - Princess Ann - Arethusa, Roman Holiday

ग्रीकांच्या लोककथामध्ये देवदेवतांना जितके महत्वाचे स्थान आणि कथानके त्यांच्या महत्वाकांक्षा, साम्राज्य आणि विस्तार कार्यांनी भरून गेलेली असतात त्याचप्रमाणे प्राचीन ग्रीकांना मनोरंजन तसेच नाटकशाळासाठी “अप्सरां”चे देखील खूप आकर्षण. त्याना इंग्रजीत Nymphs असे म्हणण्याचा प्रघात आहे. या निम्फ़्सना ना देवतेचे स्थान ना पूर्ण मानवी अस्तित्व. जलपरी म्हणून त्या सागर, नदी, जलाशय अशा ठिकाणी आपले वास्तव्य आणि रक्षण करतात अशी समजूत आहे. देव आणि देवीच्या सेवेसाठी आले बोलाविणे की या अप्सरा त्यांच्या इच्छेनुसार कामकाज करत. शेलीच्या कवितेत उल्लेख झालेली एरीथुसा खूप सुंदर होती पण ती देवी नव्हती. सिसिलीतील प्राचीन ग्रीक लोकांना ती देवीला सर्वात जवळची पृथ्वीवरील प्राणी होती. एरीथुसाने एक अप्सरा म्हणून तिच्या अस्तित्वास सुरुवात केली. ती जरी कमी देवता होती तरीही पूर्णपणे मानवी नाही. तरीही ती जलपरी म्हणून अमर मानली गेली होती. कायम तारुण्याचा तिला लाभ असला तरी देवाच्या दृष्टीने ती दासीच होती. ग्रीक पौराणिक जीवसृष्टीमध्ये मानव आणि दैवी यांच्यात एक विशेष गटाचा भाग होता तो म्हणजे कथानकात अनेक अर्ध-देव होते. एरीथुसा आणि अन्य जलपरी तरुणी कमालीच्या सुंदर होत्या. देव दर्जा असलेले कित्येक अशा विशिष्ट अप्सरांसमवेत केवळ लैंगिक आकर्षण ठेवत होते. सबब एका दृष्टीने या निम्फ़्सना केवळ देवी हीच प्रतिस्पर्धी होती.

Percy Shelley - Princess Ann - Arethusa, Roman Holiday

ग्रीक आख्यायिकातील ग्रंथरुपी नोंदीनुसार, एरीथुसा ही नेरियस आणि डोरिसची कन्या होती. जलपरीसम जीवन जगता जगता तिचे रुप आणि तारुण्य फ़ुलून येत चालले. एरीथुसा ही नेरियस आणि डोरिसची कन्या होती. आर्टिमिस नावाच्या वनदेवतेसोबत ती जंगल भ्रमण करण्यात आणि शिकारीत वेळ घालवित असे. तिने आजन्म अविवाहित राहाण्याची इच्छा बाळगली होती. एके दिवशी एरीथुसा एकटीच नदीकाठी स्नान करत असताना तिला जलदेवता अल्फीअसने, जो त्या वेळी मानवी रुपात वावरत होता, पाहिले आणि तिच्या कमालीच्या सौंदर्याने तिच्यावर लट्टू झाला. अल्फ़ीअसच्या संभाव्य धोक्यापासून दूर जाण्यासाठी एरीथुसा आर्टिमिसकडे प्रार्थना करते. ती साहजिकच मान्य करून एरिथुसाचे वसंत ऋतूत रुपांतरीत करून तिची रवानगी आयनियन समुद्राच्या परिघात असलेल्या सिरिसी येथील ऑरित्गियाच्या बेटावर जतन करते. [या बेटावर आजही वसंत ऋतुत एरिथुसाच्या नावाने जत्रा भरते आणि सिराकुसा बेटावरील लोक ती उत्सव म्हणून साजरा करतात]. मात्र तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला जलदेव अल्फ़ीअस पाण्याच्याद्वारेच समुद्र पार करून बेटावर पोचतो आणि तिथेच मग तिच्यासमवेत राहून तिला आपलीशी करतो असे काहीसे कथानक थोडक्यात सांगता येते.

Percy Shelley - Princess Ann - Arethusa, Roman Holiday
पर्सी शेलीची पाच कडव्याची ही कविता आहे, त्यातील पहिल्या क्रमांकाचे कडवे इथे देत आहे. नेटवर पूर्ण काव्य उपलब्ध आहे….जी एरिथुसाची सर्व कहाणी कथन करते.

Arethusa arose
From her couch of snows
In the Acroceraunian mountains,—
From cloud and from crag,
With many a jag,
Shepherding her bright fountains.
She leapt down the rocks,
With her rainbow locks
Streaming among the streams;—
Her steps paved with green
The downward ravine
Which slopes to the western gleams;
And gliding and springing
She went, ever singing,
In murmurs as soft as sleep;
The Earth seemed to love her,
And Heaven smiled above her,
As she lingered towards the deep.

–  अशोक  पाटील, कोल्हापूर

One thought on “कवी पर्सी शेली…. राजकुमारी ऍना…. जलपरी एरीथुसा Percy Shelley – Princess Ann – Arethusa, Roman Holiday

  • March 23, 2018 at 2:19 am
    Permalink

    Thanks Shailendra for accepting my article and for publishing the same on Ultimate-spot page which is working brilliantly.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: