सत्यकाम Satyakaam

Satyakam Movie

सत्यकाम Satyakaam

सत्यकाम Satyakaamm :
उपनिषादात “सत्यकाम” नामक एका बालकाची कथा आहे. त्या वेळेस प्रचलित असलेल्या चालिरितीनुसार मुलगा आठ वर्षाचा झाल्यावर शिक्षणासाठी त्याची रवानगी गुरुकुलात केली जात असे. सत्यकाम हा जबला नामक एका दासीचा मुलगा. अनेक घरची कामे करून तिने त्याला वाढविले होते. कष्टाने वाढवित असताना तिने त्याला सत्याची महती सांगितली होती. कोणत्याही स्थितीत सत्याचीच कास धरणे आणि असत्यापासून दूर राहाणे. सत्यकामच्या मनावर ते चांगलेच ठसले होते. गौतम मुनींचे “गुरू” या नात्याने नाव सर्वत्र सुपरिचित असे होते. त्यांच्या आश्रमात जायचे निश्चित झाले. आईला त्याने विचारले, “गुरुजींनी मी कोण कुठला असे विचारले तर काय उत्तर देवू, आई ?” यावर जबाला त्याला म्हणाली, “बाळ सत्यकामा, मी तरुण असताना निरनिराळ्या घरी दासी म्हणून नोकरी करीत हिंडत असे. त्यातच केव्हा तरी तुझा जन्म झाला. तू दासीपुत्र आहेस. तुझ्या पित्याचे नावही मला माहीत नाही. माझे नाव जबाला, म्हणून तुझे नाव सत्यकाम जाबाल असेच गुरुजींना सांग.’ तितके त्याने मनात ठेवले, कारण त्याच्या दृष्टीने ते सत्य होते. सत्यकाम गौतमांच्या आश्रमात आला.गुरुंना वंदन करून तो म्हणाला, “भगवन, मला तुमच्याजवळ राहून शिकायचे आहे.” गौतममुनींनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “ठीक आहे. मला तुझे गोत्र सांग.” सत्यकाम किंचितही न अडखळता म्हणाला, “`भगवन्, माझे नाव सत्यकाम. आईचे नाव जबाला. म्हणून मी सत्यकाम जाबाल. ह्यापेक्षा जास्त मला ठाऊक नाही.’ असे म्हणून सत्यकामाने आईने सांगितल्याप्रमाणे सर्व सांगितले. ज्या मुलाला आपले वडील कोण हे माहीत नाही, ही बाब शरमेची न मानता त्याहीपेक्षा सत्याला तो महत्त्व देत आहे ही गोष्ट गौतम मुनींना खूपच भावली आणि त्यानी आनंदाने सत्यकाम याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. आपल्या अंगभूत गुणांनी सत्यकाम लोकप्रिय तर झालाच शिवाय त्याने ‘सत्यमहत्त्व’ साधना किती समाजोपयोगी असू शकते हेही सिद्ध केले.

सत्यकाम जाबाल याच्या जीवनापासून प्रेरणा घेतल्याची उदाहरणे आहेत तर साहित्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले. बंगालचे एक लेखक नारायण संन्याल यानी “सत्यकाम” नावाची कादंबरी लिहिली. त्यावर एक आदर्शवत असा चित्रपट निघू शकेल अशी अभिनेता धर्मेन्द्र आणि त्याचे निकटचे एक मित्र पांछी यानी ठरविले. ही गोष्ट १९६७ ची. त्या वेळी धर्मेन्द्र ‘अनुपमा’ चित्रपटात नायकाची भूमिका करत होता. नायक असला तरी अनुपमा हा सर्वस्वी नायिकाप्रधान म्हणजे शर्मिला टागोर हिचाच चित्रपट होता. पण ती टीम छान जमली होती. पटकथा संवाद राजेन्द्रसिंग बेदी, गीतकार कैफी आझमी, छायाचित्रकार जयवंत पाठारे. दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी याना तर ‘सत्यकाम’ कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याची इच्छा होतीच. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या प्रवासात त्याना स्वतःला आवडलेला चित्रपट म्हणून ते आणि धर्मेन्द्र केवळ “सत्यकाम” चे नाव घेतात…साल होते १९६९. स्वातंत्र्यानंतर वीस वर्षांनी देशाची स्थिती भ्रष्टाचाराने आणि असत्याने अगदी भरभरून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. बेकारीच्या जोडीला सरकारी यंत्रणेतील बेपर्वाईने जनतेला त्रस्त करून सोडले होते. असंतोष खदखदत होता सर्वच पातळीवर. ऋषिदांनी ‘सत्यकाम’ निर्मिती करताना कादंबरीचाचा काळ पाहिला तो सुरू होत होता १९४६ मध्ये….म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर १ वर्ष. याचाच अर्थ जो तरूण त्या वर्षात पदवीच्या अंतिम वर्षाला आहे त्याच्या नजरेसमोर स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या देशाचे सुजलाम सुफलाम स्वप्न पाहाणारा असणार…तसे युवक होतेही. तरीही स्वातंत्र्यानंतर त्याना आपण आपल्या मनी जे आहे ते सत्याच्या (आणि सत्याच्याच) आधारे करू शकू का याची खात्री वाटत नसावी. “तडजोड” नामक एक सोय आपल्या अंगी असणे गरजेचे आहे का ? अस्सल सोन्यासारखे न राहता दागिना बनवायचा असेल तर त्यात काही खोट घालावी लागते असे सोनार मानतात….मग आयुष्यातही कर्तबगारीच्या दागिन्यासाठी अशी खोट घालणे क्रमप्राप्त आहे का ? अशा विविध विचारांनी १९४६-४७ मध्ये मनात गर्दी केलेली युवा पिढी होती. काही अशा तडजोडीला सहजी तयार होते पण एखादा “सत्यकाम” ही त्यात होता, ज्याने आपल्या घराण्याच्या परंपरेला तसेच शिकवणीला प्रामुख्याने स्थान देवून सत्य हाच माझा प्राण म्हणून या देशाच्या जडणघडणीत इंजिनिअर म्हणून भाग घेतला….सत्याने वागत गेला….आणि अगदी ठरल्याप्रमाणे असत्याच्या रौद्रात त्याने आपले जीवनही संपविले….ती कहाणी म्हणजेच चित्रपट “सत्यकाम”.

Satyakam Movie Images

(सत्यप्रिय आपल्या मित्राला आकाशातील स्वाती आणि चित्रा हे तारे दाखवित असताना….)

चित्रपटाची कथा सांगत आहे नरेन्द्र शर्मा. हा नरेन् म्हणजे सत्यप्रिय आचार्य याचा हॉस्टेलमधील मित्र. दोघेही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. नरेन्द्रच्या दृष्टीने सत्यप्रिय आणि त्याचे आजोबा सत्यशरण हे एक आदर्श कुटुंबच. आजोबांच्या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा खोलवर परिणाम सत्यप्रियच्या जडणघडणीवर झालेला आहे. कॉलेजमध्ये त्याला कित्येक प्रकारच्या स्वभावाचे मित्र भेटले आहेत. पण नरेन्द्र शर्मासमवेतची मैत्री त्याला प्रिय आहे. स्वप्नाळू दुनियेत हे युवक आहेत आणि अगदी काही महिन्यातच “स्वतंत्र भारत” अस्तित्त्वात येणार असल्याने या नव्या देशाला आपण इंजिनिअर्स किती हातभार लावू शकतो याचाही त्याना मनस्वी आनंद होत आहे. ज्या दिवशी परीक्षेच्या निकाल लागतो त्याच दिवशी उत्तीर्ण झालेले हे सारे युवक सहलीसाठी जातात. पण दुर्दैवाने त्यांच्या बसला अपघात होतो. इंजिनिअरिंगला प्रथम आलेला एक शीख विद्यार्थी मरण पावतो. सत्यप्रियही जखमी होतो अन्य काही मित्रांसमवेत. सुखरुप असतो तो फक्त नरेन्द्र शर्मा. त्या शीख युवकाचे आईवडील मुलाच्या चौकशीसाठी तात्पुरत्या बांधलेल्या छावणीत येतात तर त्यांच्यासमोर नरेन्द्र खोटे बोलू शकत नाही. तो त्या पालकांचा आक्रोश पाहून कोसळतोच. सत्यप्रिय रात्री त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. नरेन्द्र म्हणतो, “सत्य…ह्या जगात काय आहे नक्की ? आजच माणूस उद्या नाही. तू आज माझ्यासमोर आहेस उद्या कुठे जाशील हे मला माहीत नाही…हे संबंध, ही नाती…कितपत खरी आहेत ?” सत्यप्रिय समजतो की आपला हा मित्र फार भावनीक झाल आहे. तो म्हणतो, “हे पाहा नरेन, अशा निराशाजनक विचार करू नकोस. जगात आपण कुठेही असलो तरी राहाणार या आकाशाच्या खालीच ना ?…वर बघ त्या चमचम करणार्‍या तारकांकडे….ती एक डाव्या बाजूला दिसते ना….त्या तार्‍याचे नाव आहे स्वाती…” इथे सत्यप्रिय हलकेच स्मित करतो नरेनकडे पाहून आणि हळूच म्हणतो, “एक गुपीत सांगू तुला नरेन…? मी स्वातीच्या प्रेमात पडलो आहे…” नरेनही मग हसतो…ते पाहून सत्यप्रिय परत त्याचे आकाशाकडे लक्ष वेधतो, “स्वातीच्याच शेजारी लुकलुकणारा आणखीन एक तारा बघ…तिचे नाव आहे चित्रा….तू या चित्रावर प्रेम कर….म्हणजे जगात आपण कुठेही असलो तरी रात्रीच्या समयी असे तारकांकडे पाहताना आपल्याला एकमेकाची नक्कीच आठवण येणार…” सत्यप्रियचा हा आशावाद नरेनला भावतो….आणि दुसर्‍या दिवसापासून त्यांचे इंजिनिअर्स म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्य सुरू होते.

सत्यप्रिय आजोबांच्याकडे येतो. त्या ठिकाणी त्यांच्यासमवेत आनंदाचे चार दिवस घालवायचे असतात. नोकरीचे पहिले पत्रही तिथेच येते. आजोबांचा निरोप घेऊन सत्यप्रिय मुंबईला त्या पेपरमिल्सच्या ऑफिसमध्ये येतो मुलाखातीसाठी. पण तिथे आल्यावर तो काहीसा अस्वस्थही होतो. कारण ऑफिसमधील कुणीच व्यक्ती काहीही काम करीत नसते. आत चेम्बरमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी दोन सदस्य बसलेले आहेत, त्यांच्या बोलण्याचा आवाज येत आहे. सत्यप्रियजवळ कंपनीचा ओव्हरसीअर चटर्जी येतो. आपली ओळख करून देतो. थोड्यावेळाने सत्यप्रियला मुलाखतीसाठी आत बोलाविले जाते. तिथे त्या दोन व्यक्ती अगदी नावापुरती मुलाखत घेतात आणि “मि.आचार्य तुम्ही आजपासूनच कामावर हजर राहा” असे त्याला सांगतात. सत्यप्रियला अर्थातच आनंद होतो. “सायंकाळी बोर्डाचे सर्वच सदस्य येतील त्यावेळी आपल्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा आपण करू…” असे सचिव सांगतात. चटर्जीकडे कामाची चौकशी केल्यावर तो सांगतो की “सर, काम तर इथे काहीच नाही. पण आपल्याला बाहेरगावी जायाला लागणार आहे.” सायंकाळी सत्यप्रिय मीटिंगची वाट पाहात थांबतो. रात्र होत आली आहे पण त्याला आत कुणीच बोलावत नाही. अस्वस्थ होऊन तो स्वतःच दार उघडून मीटिंगमध्ये प्रवेश करतो. तिथे कुंवर विक्रम सिंग…जो एका संस्थानाचा राजकुमार आहे…आणि पेपरमिल्सचे डायरेक्टर्स चर्चा करीत आहेत. सत्यप्रियला पाहून सचिव त्याची “आपल्या प्रोजेक्टचे हे नवीन इंजिनिअर” ही ओळख करून देतो. प्रिन्सला ह्या इंजिनिअरच्या कामापेक्षा त्याच्या स्वाक्षरीची काही कागपत्रावर सही आवश्यक असते आणि त्याचा मुख्य हेतू संस्थानातील जमिनीच्या खाली जी काही खनीज संपत्ती दडलेली आहे तिच्यावर आपल्या हक्काची मोहोर उमटावयाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या काही हालचाली सुरू होत आहेत संस्थानिकांच्या अस्तित्वासाठी त्यात सरकार ह्या जमिनीही ताब्यात घेणार असल्याची भीती प्रत्येक राजाला वाटत होती. सत्यप्रियला भवानीगंज या संस्थानाच्या गावी घेऊन जाऊन तिथे पेपर मिल्सच्या नावाखाली केवळ सर्व्हेचे नकाशे तयार करायचे आहेत एवढीच बोर्डाची अपेक्षा असते. रेल्वेने सत्यप्रिय आपल्या सहकार्‍यांना घेऊन संस्थानाच्या गावी पोहोचतो. तिथे राजकुमारची रखेल रंजना हिच्याशी त्याची चहापानाच्यावेळी भेट होते. ना तो ना ती त्याच्याकडे पाहते. दोघेही स्वतंत्रपणे आपल्या कामाला लागतात. एके दिवशी संस्थानाच्या रेस्ट हाऊसवर सायंकाळी नकाशाचे काम करीत असताना त्याला खोलीबाहेर दोघांचे भांडणारे आवाज ऐकू येतात. रुस्तम हा राजकुमारचा सांगकाम्या जो आता दारुच्या नशेत आहे आणि त्याच्याकडे राहत असलेली ती देखणी मुलगी रंजना…तिला खेचत तो सत्यप्रियच्या खोलीत आणत आहे. सत्यप्रियला हा गोष्टीचा संताप येतो. रुस्तम बरळत म्हणतो, “बघा, सर. ही किती मस्तवाल मुलगी आहे ? एवढा मोठा राजकुमार हिला आपली हो म्हणत आहे आणि ही नकार देत आहे. तुम्ही तरी हिच्या डोक्यात काहीतरी अक्कल घाला…” सुरुवातीला चिडलेला सत्यप्रिय आता रडत उभी असलेल्या रंजनाच्या अवस्थेकडे पाहून रुस्तमला तिला या स्थितीपर्यंत आणल्याबाबत दोष देतो. पण रुस्तम ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. तो रंजनाला सत्यप्रियच्या खोलीत सोडून निघून जातो.

Satyakam Movie Images
(अचानकच आपल्या खोलीत आलेल्या रंजनासोबत संवाद साधून तिच्याविषयी माहिती विचारत असलेला सत्यप्रिय)

सत्यप्रियला रंजनाकडून तिच्यासंदर्भात बरीच माहिती समजते त्यापैकी महत्त्वाची म्हणजे रंजना ही काही कुठली अनौरस मुलगी नसून तिची आई ह्या रुस्तम नामक ड्रायव्हरबरोबत घरातून पळून गेलेली स्त्री आणि रंजना त्यांचे अपत्य. आता रुस्तम हा राजकुमार कुंवर विक्रमचा दास असल्याने तो स्वत:च रंजनाला त्याच्या दावणीला बांधत आहे. सत्यप्रियला जगात अशाही गोष्टी चालतात याचे दु:ख होते. तो दुसर्‍या दिवशी चटर्जीला घेऊन साईटवर निघतो तर रंजनाही त्याच्यासोबतीला सुट्टी घालवायची ह्या बहाण्याने येते. राजकुमार दिल्लीला गेले आहेत. त्याच्यासोबत दिवाणजी आणि रुस्तमदेखील आहेत. संस्थानाच्या त्या मोकळ्या वातावरणात रंजना आता सत्यप्रियसारखा युवक सोबतीला असल्याने उल्हसित झाली आहे….ती त्या दोघांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी घेते….ते कामात असताना मनमोकळेपणाने नदीकाठाने हिंडते, फिरते, गाते….आणि सत्यप्रियवरील आपले मुग्ध प्रेमही इशार्‍यातून व्यक्त करत राहते. सत्यला हे सारे अर्थातच समजते पण त्याला माहीत आहे की आजोबांच्या शिकवणीनुसार आपण वर्तन करायचे असल्याने एका विशिष्ट मर्यादेबाहेर जाऊन आपण कुणालाही कसले वचन देऊ शकत नाही. तो आपल्या मनावर ताबा ठेवतो. पण एके रात्री ती वेळ येतेच ज्यावेळी रंजना मन घट्ट करून सत्यप्रियला आपली स्थिती सांगायचे ठरविते. चांदण्या रात्री तंबूबाहेर बसून तो नरेन्द्रला पत्र लिहित आहे इथल्या परिस्थितीविषयी, ते पाहून रंजना तिथे येते. पत्राविषयी विचारते. तो सांगतो….त्या ओघात रंजना बोलून जाते, “तुम्ही इथले काम संपले की निघून जाल…पण मला सांगा मी इथे काय करू ?” यावर सत्यप्रियकडे अर्थातच उत्तर नसते. तो अवघडतो, म्हणतो “रुस्तमजीनी तुझ्या भविष्याविषयी काही तरी विचार केला असेलच ना ?” रंजना विशादाने म्हणते, “त्यांचा एकच विचार….कुंवरजीची रखेल म्हणून राहा….” सत्यप्रिय काहीच बोलत नाही हे पाहून रंजना मन घट्ट करते आणि म्हणते, “बाबूजी, तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन चला….तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करा असे मी म्हणणार नाही….मी तुम्हा दोघांची दासी होऊन तुम्ही राहाल तिथे काम करीन…पण मला या नरकातून बाहेर काढा….” यातील कळवळीचा मुद्दा सत्यप्रियपर्यंत पोचतो पण तोही आता अस्वस्थ आहे, म्हणतो, “रंजना, आज खुद्द मीच कुठे पक्का नाही. मला नव्याने सुरू करायचे आहे सारे. फिरावे लागणार…तुला कुठे घेऊन जाऊ मी ? आणि गेलो म्हणजे आपणा दोघांना एकत्र राहावे लागणार….अशा परिस्थितीत माझ्याकडून काही अपराध झालच तर ?” रंजनाला त्या शक्यतेची पर्वा वाटत नाही. ती त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणते, “तसे झालेच तर मी तुमचा तो हक्क आहे असेच मानेन…” ह्या थेट उत्तराचा सत्यप्रियला राग येतो….”असा विचार तरी तू कसा करू शकतेस ? तू निघून जा आता इथून रंजना…” ती उठते आणि चिडून म्हणते, “जाते मी…काय व्हायचे तो होऊ दे माझे, पण मी आता १९ वर्षाची आहे, मोठी आहे, असे सांगायला येऊ नका…”. ती जाते तोच दुसर्‍या बाजूने रुस्तम संस्थानाची जीप घेऊन तिथे येतो आणि रडणार्‍या रंजनाला घेऊन वाड्यावर जातो. तिथे कुंवर विक्रमसिंग जो दिल्लीतील अपयशी वाटाघाटीमुळे आलेल्या नैराश्याने ग्रासलेला आहे आणि नशेतही आहे. त्याला आता रंजना हवी आहे….त्याची इच्छा रुस्तम पुरी करतो. नकाराचा आटापिटा करण्यार्‍या त्या पाखराचा हा ससाणा भक्ष्य करतो…रंजना मोडून जाते. इकडे जंगलातील तंबूत चटर्जी सत्यप्रियला “तुम्ही सर रंजनाबरोबर जायला हवे होते….त्या बिचारीला आज कुंवर सोडणार नाहीत हे खरे…” चटर्जीच्या या बोलण्यवर सत्यप्रिय चिडतो कारण त्याच्याही मनी तोच विचार आलेला असतो. पण त्या रात्री तो काहीच करू शकत नाही. सकाळी उठून तो रुस्तमच्या घरी जातो. तिथे पाहतो तर रंजना एका कॉटवर हुंदक्यांनी रडत आहे तर रुस्तम खाली मान घालून बाजूला बसला आहे. सत्यप्रिय जाणतो की रात्री ह्या मुलीवर काय संकट कोसळले असेल. तो सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करतो पण रंजना संतापाने उसळते, “तुम्ही यात पडू नका…हे माझ्या नशिबी आले आहे ना….तर मी भोगते सारे आता…” सत्यप्रिय रुस्तमला म्हणतो, “तुम्ही परवानगी देत असाल तर मी रंजनाला माझ्यासोबतीने घेऊन जातो इथून…” रुस्तम नकार देताना स्पष्टच म्हणतो, “तुम्ही घेऊन जाणार म्हणजे तिच्याबरोबर तुम्ही काय लग्न करणार ? लग्न न करता ठेवलेल्या मुलीला रखेल म्हणतात. चालेल तुम्हाला ?” सत्यप्रिय खाली मान घालून म्हणतो, “मी जरी हिच्यासोबत लग्न करू शकत नसलो तरीही कुणा एका खुल्या विचाराच्या युवकाबरोबर हिचे लग्न लावून देईन मी….” ऐकून रंजना परत चिडते, “ती काळजी तुम्ही का करता बाबूजी….मरू दे ना मला माझ्या नशीबाकडे पाहून…” सत्यप्रिय मनाशी एक पक्का निर्णय घेतो आणि दोघांकडे पाहून म्हणतो, ‘ठीक आहे, रंजना…मी तुझ्याबरोबर लग्न करीन.” रंजना व रुस्तम अविश्वासाने त्याच्याकडे पाहतात…”म्हणजे काल रात्री जे काही घडले, ते जाणूनसुद्धा ?” सत्यप्रिय म्हणतो, “होय, ते माहीत असूनसुद्धा…काल मी असे का वागलो याचे उत्तर नाही माझ्याकडे…पण मी आज हिला पत्नी मानतो…”.

संसार सुरू होतो सत्यप्रिय रंजनाचा. संस्थान सोडून देशाच्या विविध भागात इंजिनिअर म्हणून सत्यप्रियला नोकर्‍याही ठिकठिकाणी मिळतात. पण ह्याच्या सत्यवचनी वृत्तीचा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला तापच होत जातो आणि सत्यप्रियला देश स्वतंत्र होऊनसुद्ध कुणालाच या देशाची भ्रष्टाचारासमोर कसलीही फिकीर नाही याची जाणीव त्रस्त करू लागते. तरीही एकला चलो रे या नात्याने तो आपल्या सत्याची कास कधीच कुठेही सोडत नाही वा तडजोडही करीत नाही. वेळप्रसंगी तो पटत नसले तर जागेचा राजीनामा देऊन मोकळा होतो, नवीन गावी रुजू होण्यासाठी. रंजना गरोदर राहते. मुलगा होतो. बाळाला आजोबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तो पत्नीला घेऊन गुरुकुलाच्या ठिकाणी येतो. रंजनाला तो बैलगाडीत मुलासह बसवितो आणि गुरुकुलाच्या बाहेर उभे राहूनच “दादाजी….” अशी आजोबांना हाक मारतो. आनंदाने “कोण ? सत्य ?” असे म्हणत दादाजी बाहेर येतात. सत्यप्रिय रंजनाला खूण करून बोलावितो आणि “दादाजी ही माझी पत्नी रंजना…” अशी ओळख करून देतो. रंजना आजोबांच्या पायाला हात लावणार असते परंतु सत्यप्रिय ते तिला करू देत नाही. मुलगा गाडीत रडत आहे ते पाहून रंजना तिकडे जाते. आजोबांना कळत नाही की हे सारे काय चालले आहे. ते विचारतात, “ही मुलगी कोण ? तू लग्न कधी केलेस…? आणि तिला नमस्कार का करू दिला नाहीस ?” सत्यप्रिय नम्रपणे सत्य सांगतो, “मी जे तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला पटले तरच तिला तुम्हाला नमस्कार करता येईल. ही मुलगी आपल्या घराण्यातील नाही. हिच्याशी मला लग्न करावे लागले आहे….” आजोबा गोंधळतात, “ते ठीक आहे, पण लग्न केव्हा केलेस ?” “आठ महिने झाले, दादाजी….”. मुलाच्या रडण्याचा आवाज येतो…आजोबा मनी काहीतरी हिशोब करतात, “म्हणजे तुझ्या पापवर पांघरून घालायला हवे म्हणून तुला या मुलीशी लग्न करावे लागले असे म्हण ना…” सत्यप्रिय ठामपणे म्हणतो, “मी कसलेही पाप केलेले नाही दादाजी. लग्न केले आहे, तो मुलगा माझा आहे पण माझ्यापासून नाही.” ह्या सत्यस्फोटामुळे आजोबा अगदी मुळापासून हादरून जातात….त्याना आता काय बोलावे हे समजत नाही. कसेबसे म्हणतात “बरे झाले…बरे झाले असल्या मुलीला तू मला नमस्कार करायला लावला नाहीस…” असे म्हणून जणू काही आपल्या नातवाकडे कायमची पाठ फिरविल्यासारखे गुरुकुलाचा दरवाजा लावून घेतात…..सत्यप्रिय रंजना आणि बाल काबुल यांच्यासह तिथून निघून जातो, कायमचा.

सत्यप्रियच्या नोकरीच्या स्थितीत कसलाही फरक पडत नाही. जिथेजिथे लाचखोरी आणि दफ्तरदिरंगाई, वरीष्ठांची दडपशाही चालूच आहे. सरकारी खाती अगदी त्या विभागाच्या मंत्र्यापर्यंत भ्रष्ट झाल्याचे पाहून सत्यप्रियमधील स्वप्नाच्या आधारे आदर्श भारत पाहू इच्छिणारा तरुण आता कोलमडत चालला आहे. त्याला सिगारेटचे व्यसन लागते. रंजनासोबत संसार तर चालू आहे पण त्याने लग्न केले ते एका युवतीला नरकातून वाचविण्यासाठी. तिच्याकडे तो परंपरेने चालत आलेल्या “पत्नी” पदाला पात्र असे पाहात नाही. खुद्द रंजनाला त्याचे अतीव दु:ख आहे. काबुलला तो आपला मुलगा मानतो, प्रेमही देतो…गुरुकुल पद्धतीने त्याला शिकवितही आहे, पण रंजनाला कधी हातही तो लावण्याचा विचार करीत नाही. रंजना ही सारी कहाणी त्याचा परममित्र नरेन्द्रला सांगते. तो आता डिव्हिजनल इंजिनिअर झाला आहे आणि त्याच्या विभागातील एका सेक्शनमध्ये सत्यप्रिय आचार्य नामक इंजिनिअर आहे हे समजल्यावर अगदी आनंदाने तो त्या सेक्शनकडे जातो. दोन्ही मित्र इतक्या वर्षांनी भेटल्याचे पाहून आनंदाने मिठी मारतात. रेसिडेन्शील विभागात जाऊन तो रंजना आणि काबुलला भेटतो. चहासाठी “मी सत्यला घेऊन येतो…” असे रंजनाला सांगतो पण ती घाबरून “नको नको त्याना नका बोलावू. साडेपाचच्या आत एक मिनिटेही ते इकडे येणार नाहीत” असे सांगते. पण नरेनला आपल्या मैत्रीची तो इतकीही किंमत करणार नाही का ? असे म्हणत सत्यच्या कार्यालयात जाऊन “चल, सत्य…चहा घेऊन रंजनाभाभीसमवेत..” असे हसत म्हणतो, पण सत्यप्रिय त्याला नकार देतो. “माझी ऑफिसची वेळ अजूनी संपलेली नाही. मी त्या अगोदर नाही येऊ शकत…सॉरी.” सत्याने वागण्याचा हा अतिरेक होतोय असे नरेनला वाटते आणि चिडून तो म्हणतो “मी तुझा बॉस आहे…त्या नात्याने मी तुला सांगतोय की तू चल माझासोबत…” तर त्यालाही उत्तर असते सत्यचे “तुम्ही बॉस आहात हे मान्य. पण सांगितलेली गोष्ट योग्य असेल तरच मी ती मानेन…” संतापलेला नरेन रंजनाचा वरवर निरोप घेऊन निघून जातो.

काही दिवसांनी नरेन्द्रच्या ऑफिसमध्ये दारावर टकटक करत ओव्हरसीअर चटर्जी आत येतो आणि नरेन्द्रला “मी सत्यप्रिय आचार्य यांच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे. त्यानी तुमचे नाव सांगितले म्हणून आलो आहे…आचार्यसरांना दवाखान्यात ठेवले आहे” नरेन्द्रला आश्चर्य वाटते “का ? काय झाले आहे ?” चटर्जी खाली मान घालून पुटपुटतो…”त्यान कॅन्सर झाला आहे सर….शेवटच्या स्टेजला आहेत…” नरेन्द्रला हा मोठा धक्का असतो. तो लागलीच चटर्जीसोबत दवाखान्याकडे जातो. एका रूममध्ये प्रकृतीची अवस्था झालेला सत्यप्रिय पडलेला असतो….एकेकाळी रुबाबदार असलेला हा देह आता वाळून गेलेल्या ओंडक्यासारखा झाला आहे. देशात असलेल्या भ्रष्टाचारुपी कॅन्सरने माझ्या मित्राचा घास घेतला आहे हे नरेन्द्र जाणतो….त्याच्या रडण्याच्या आवाजाने सत्यप्रिय जागा होतो….मित्राला इतक्या जवळ पाहून स्मितहास्यही करतो. मरणासन्न स्थितीतही नरेन्द्रला विचारतो, “माझ्या मागे रंजना आणी काबुलचे काय होईल याचीच चिंता लागून राहिली आहे…” नरेन्द्र त्यांच्याविषयी तू काळजी करू नकोस मी त्या दोघांना माझ्याकडे आणू शकतो….थोड्या वेळाने नरेन्द्र आणि त्याची पत्नी निघतात….लिफ्टची वाट पाहात असताना त्याची पत्नी म्हणते, “तुम्ही रंजना आणि काबुलची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका….आईना ते आवडणार नाही. दरमहा आपण काहीतरी रक्कम देत जाऊ त्याना…” नरेन्द्रही विचारात पडतो…”बरं ते असू दे…त्यावर करू नंतर विचार…” म्हणत लिफ्टमध्ये जातो. विशेष म्हणजे पतीपत्नीचा आपल्या भविष्याविषयीची हा संवाद जिन्यावर असलेली रंजना ऐकते. आपल्या भविष्याविषयी अन्यांवर जबाबदारी नको म्हणणार्‍या रंजनाजवळ जगण्यासाठी आता एकच मार्ग आहे तो म्हणजे एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मि.लाडकर यानी तिच्याजवळ दिलेली काही कागदपत्रे.

Satyakam Movie Images

(कागदपत्रावर सह्या मागण्यासाठी आलेली रंजना)

बांधकामासंदर्भात इंजिनिअर सत्यप्रिय आचार्य यानी त्यांचे काही पेमेंट थांबवून ठेवले आहे. ती रक्कम बरीच मोठी आहे. त्या कागदपत्रावर जर सत्यप्रिय आचार्य यानी सही केल्यास कॉन्ट्रॅक्टर लाडकर याना सरकारकडून बरेच मोठी रक्कम मिळणार असते, त्यातील काही रक्कम ते रंजनाला देऊ करतात म्हणजे त्याच्या आधारे सत्यप्रियच्या मृत्युनंतर स्वतंत्र उद्योगधंदा सुरू करू शकतील आणि स्वतःचा तसेच काबुलचाही सांभाळ करतील. सुरुवातीलाच रंजनाने हा प्रस्ताव धुडकावलेला असतो. पण आता बदलत्या परिस्थितीत आपल्याला अशा पैशाचा आधार घेणे गरजेचे ठरणार असा समज ती नरेन्द्र आणि त्याच्या पत्नीचा संवाद ऐकून करून घेते. सत्यप्रियच्या रुममध्ये येते. त्याला औषध देत असतानाच “नरेन आला होता…त्याला तुझ्याविषयी अर्थातच माहीत आहे….तो म्हणाला तुला त्याच्याकडे जाता येईल….” तत्क्षणी रंजना त्याच्यावर संतापून चिडीने म्हणते, “नरेन नरेन नरेन….जगात दुसरे कुणी नाही का तुम्हाला ? का त्यानी माझी जबाबदारी स्वीकारावी ? ऐकणार आहात तुम्ही ते आणि त्यांची पत्नी काय म्हणत गेले माझ्याविषयी ? आहे हिंमत तुमच्यात ? आयुष्यभर निव्वळ सत्य सत्य करीत राहिला आणि आज मरणाच्या दारात आलात तरी तुम्हाला कळत नाही सत्य प्रत्यक्षात काय असते….” सत्यप्रिय अवाकच होतो रंजनाचा हा उद्रेक पाहून….कसाबसा म्हणतो, “काय झाले रंजना…” ती आता अन्य काही न बोलता मुद्यावर येते, “मी आले होते हे काही डॉक्युमेन्टस तुम्हाला दाखवायला आणि फेकून द्यायला…पण आता पटते की याच्याशिवाय आम्हाला जगण्यासाठी दुसरा पर्याय नाही….मला मि.लाडकर यानी ही कागपत्रे दिली आहेत. यावर तुमची सही झाली की ते मला काही मोठी रक्कम देतील, त्याआधारे मी आणि काबुल जगू शकू….” सत्यप्रिय अविश्वासाने पत्नी आणि त्या कागदपत्रांकडी पाहात राहतो….त्याला सुचेनासे होते….डोळे मिटून घेतो… विचार करतो.

रात्री कॉन्ट्रॅक्टर लाडकर यांच्या घराचा दरवाजा वाजतो. बाहेर नरेन्द्र आला आहे रंजनाला इस्पितळात नेण्यासाठी. सत्यप्रिय शेवटच्या घटकेत असल्याची बातमी देतो. रंजना त्या अगोदर नरेन्द्रला निक्षून सांगते “मी येतेच पण तुम्ही तातडीने दादाजींना बोलावून घ्या….अंत्यसंस्कार काबूल नाही करणार. ते करतील…” नरेन्द्र काही न बोलता तसे करतो असे वचन देतो आणि रंजनाला दवाखान्यात सत्यप्रियच्या खोलीत आणतो. तिथे गर्दी असतेच. नरेन्द्र जवळजवळ बेशुद्धीत असलेल्या सत्यप्रियजवळ जाऊन हलकेच विचारतो, “काही सांगायचे आहे सत् ?” सत्यप्रिय नजरेने रंजनाकडे खूण करतो…नरेन्द्र खोलीतून सर्वांना बाहेर यायला सांगतो. रंजना रडतरडत या असलेल्या पण नसलेल्या नवर्‍याजवळ येऊन बसत, त्याच्या प्राण जात असलेल्या चेहर्‍याकडे पाहते. तो तिच्याकडेच पाहत उशीखालून ती डॉक्युमेन्ट्स काढतो, तिच्याकडे देतो आणि शून्य नजरेने तिच्याकडे पाहात राहतो….रंजना भीतीने कापत आहे आता….ती कागदपत्राकडे पाहाते आणि तळात नवर्‍याने केलेली मंजुरीची “एस.पी.आचार्य” ही सही तिला दिसते….”माझ्यासाठी ? माझ्यासाठी…तुम्ही हे केलेत ? तुम्ही तुमच्या सत्य घराण्याची परंपरा तोडलीत ? नाही होऊ देणार मी…नकोय मला हे सारे….” असे रडतरडत हुंदक्यांनी ती आपल्या भावनांना वाट करून देते आणि ती सहीची सारी डॉक्युमेन्ट्स टराटरा फाडून टाकते….ते पाहाणार्‍या सत्यप्रिय आचार्यला आनंद अनावर होतो. निदान एका तरी व्यक्तीला सत्याचे महत्त्व काय असू शकते हे समजल्याचा तो आनंद आहे….तो रंजनाला प्रथमच बाहुपाशात घेण्यासाठी आपले हात पसरतो तेव्हा रंजनाही आवेगाने त्याच्या कवेत जाते. तिला पती मिळतो तो असा.

रात्री आजोबा सत्यचरण येतात आणि ते नातवाची अवस्था पाहून दु:खी तर होतात पण त्याने कधीही सत्यापासून स्वतःला अलग केले नाही याचाही अभिमान आहेच त्याना. त्यांच्या मंत्रोच्चाराच्या घोषात सत्यप्रिय आचार्य प्राण सोडतो. स्मशानात अग्नी देताना आजोबा काबुलला ते काम करू न देता “तो लहान आहे अजूनी” असे म्हणत स्वतःच नातवाच्या प्रेताला अग्नी देतात. नरेन्द्र शर्माच्या घरी सारी मंडळी जमली आहेत. तो म्हणतो “रंजनाभाभी आणि काबुल यांची जबाबदारी मी घेतो, दादाजी….” दादाजीना त्यात आक्षेप घेण्यासारखे काही वाटत नाही. “ते तू ठरव नरेन. सत्यप्रियचे दिवस घालण्याची जबाबदारी मी पार पाडेन…” नरेन्द्रचे पुरोहित जवळच असतात, ते म्हणतात, “पण आचार्यजीना मुलगा असताना तुम्ही ते करावे हे योग्य नाही…” त्यावर आयुष्यात प्रथमच दादाजीना खोटे बोलावे लागते, “नको, तो अजूनी लहान आहे, म्हणून…” नरेन्द्रच्या शेजारी बसलेला छोटा काबुल सार्‍यांसमोर मोठ्याने म्हणतो, “असे नाही….मी लहान आहे म्हणून नव्हे तर मी बाबांचा मुलगा नाही…यासाठी दादाजी नको म्हणतात…” दादाजींना सत्याचा हा एक नवाच पदर दिसतो. “काय ? काय म्हणालास तू ?” काबुल म्हणतो, “होय, मला माहीत आहे मी सत्यप्रिय आचार्य यांचा मुलगा नाही. मला आईने सारे सांगितले आहे. ती कधीही खोटे बोलत नाही.” सत्याचा मार्ग कधीही न सोडणार्‍या सत्यशरण याना हा एक तडाखाच असतो…अन् तोही अशा एका मुलीकडून जिच्या घराण्याबद्दल वा तिच्या मुलाबद्दल यानी चांगले उदगार काढलेले नसतात. सत्यता ही कुठल्या विशिष्ट घराण्याची, जातीची, धर्माची मालकी नसून ती आहे संस्काराची. संस्कार कुणावर आणि कसे घडतात हे त्या व्यक्तीचे वर्तन सांगते….जात नाही. हा महत्त्वाचा धडा या मुलाला अशा आईने शिकविला जिला आपण आपली मानले नाही.

डोळ्यात पाणी आणून…”माझी गावाकडे जाण्याची तेवढी सोय कर” असे ते सांगतात. नरेन्द्र “तशी मी सोय केली आहे. पण जाण्यापूर्वी रंजाना तुम्हाला नमस्कार करू इच्छिते. तेवढी परवानगी द्या…” ते होकार देतात. पांढर्‍या साडीतील रंजना बाहेर येते….दादाजींच्या पायावर डोके ठेवते….तोच ते तिला धीर देत म्हणतात, “अगं नमस्कार काय करतेस ? चल तुझी बॅग घे….काबुलला घे….आपल्याला जायचे आहे गुरुकुलला…तिथे तुझ्या मुलाला शिकवायचे आहे ना ?” आनंदाचा धक्का बसलेली रंजना स्फुंदून स्फुंदून रडू लागते…तिच्या खांद्यावर हात ठेवून तर आपल्या खांद्यावर पणतूला घेऊन सत्यशरण आचार्य नवा “सत्यकाम” तयार करण्यासाठी चालू लागतात.

कलाकार व भूमिका :
अशोककुमार – सत्यशरण आचार्य
धर्मेन्द्र – सत्यप्रिय आचार्य
शर्मिला टागोर – रंजना
संजीवकुमार – नरेन्द्र शर्मा
सारिका – काबुल
तरुण बोस – कॉन्ट्रॅक्टर लाडकर

–  अशोक  पाटील, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *